महाराष्ट्रातील सत्तानाट्यात भाजपने प्रथमच पत्ते उघडले; मुनगंटीवार म्हणाले..
भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झाली, या बैठकीनंतर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधून भाजपची भूमिका स्पष्ट केली.
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या कारवाईपासून दिलासा दिल्यानंतर आता पहिल्यांदाच राज्याच्या सत्तानाट्यात भाजपची एण्ट्री झाली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर झाली, या बैठकीनंतर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधून भाजपची भूमिका स्पष्ट केली.
ट्रेंडिंग न्यूज
मुनगंटीवार म्हणाले की, भाजप सध्यातरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून अद्याप सरकार स्थापनेचा किंवा कोणत्या पक्षासोबत जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसेच शिंदे गटाकडून कोणताही प्रस्ताव भाजपला आला नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भाजपच्या कोअर कमिटी बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
सद्यस्थितीला शिंदे गटाकडे जवळपास ४० आमदार असून ठाकरेंसोबत असणारे आमदार शिंदे गटात सामील होत आहे. याबाबतच बोलताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना सध्यातरी असा कोणताही निर्णय़ भाजपने कोअर कमिटी बैठकीत घेतलेला नाही. तसंच कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर विधिमंडळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे आकलन केले गेले असून गरज पडल्यास पुन्हा कोअर टीमची बैठक घेऊन आम्ही निर्णय़ घेऊ, असंही ते म्हणाले.
भाजप आमदारांना मतदार संघातच राहण्याच्या सूचना
भाजपच्या सर्व आमदारांना मतदारसंघातच रहा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोणीही राज्याबाहेर आणि देशाबाहेर जाऊ नका असंही त्यांना सांगितला गेलं आहे. राज्यात राजकीय परिस्थिती अस्थिर आहे त्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्याचंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.