Kalavati Bandurkar: संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे. कलावती बांदूरकर नावाच्या महिलेबद्दल अमित शाह खोटे बोलल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही अमित शाहांवर तोफ डागली आहे. गृहमंत्री देशाला किती चुकीची माहिती देतात आणि किती ठासून खोटे बोलतात? हे कलावतीच्या कालच्या वक्तव्यावरून आपल्याला समजले आहे. संपूर्ण देशाने केंद्र सरकारचा खोटेपणा पाहिला आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वडेट्टीवार यांनी कलावती यांच्यावरून अमित शाहांवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस नेते राहुल गांधींचे सामाजिक काम आणि त्यांनी दिलेला शब्द पक्का आहे, हे देशातील जनतेला माहिती आहे. राहुल गांधी यांनी कलावतीच नाही तर निर्भयाच्या भावाला पायलट बनवण्याचा दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला. सध्या सत्य नाही तर असत्य बोलून देश चालवला जात आहे. गृहमंत्र्यांच्या भाषणातून हे देशाला कळून चुकले आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदूरकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केल्याचा दावा केला. मात्र, कलावती यांच्याकडून अमित शाह यांचा दावा फेटाळण्यात आला. आपल्याला भाजपकडून कुठलीही मदत मिळाली नसल्याचे त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितले. अमित शाह यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.