मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sushma Andhare : ‘गडकरी गोपीनाथ मुंडेंना ट्रॅपमध्ये अडकवायचे, आता फडणवीस पंकजा मुंडेंना अडकवतायंत’

Sushma Andhare : ‘गडकरी गोपीनाथ मुंडेंना ट्रॅपमध्ये अडकवायचे, आता फडणवीस पंकजा मुंडेंना अडकवतायंत’

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 04, 2022 10:34 AM IST

Sushma Andhare Speech : व्यासपीठावर मुलीचा फोटो भेट देण्यात आल्यानं शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे भावूक झाल्या झाल्याचं पाहायला मिळालं.

Sushma Andhare On BJP
Sushma Andhare On BJP (HT)

Sushma Andhare On BJP : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष अजूनही सुरूच आहे. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रा सुरू केली असून अनेक जिल्ह्यांमध्ये त्या जाहीर सभा घेऊन भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल करत आहे. परंतु त्यांनी भंडाऱ्यातील एका भाषणात केलेल्या वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यातील संबंधावर भाष्य केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भंडाऱ्यातील महाप्रबोधन यात्रेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, नागपूर आणि बीड जिल्ह्यातील राजकीय संघर्ष हा पहिल्यापासून चालत आलेला आहे. नितीन गडकरी हे जाणीवपूर्वक गोपीनाथ मुंडेंना ट्रॅपमध्ये अडकवायचा प्रयत्न करायचे, असा गौप्यस्फोट शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. याशिवाय आता पंकजा मुंडेंना अडकवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याचंही अंधारे म्हणाल्या. त्यामुळं आता त्यांच्या या वक्तव्यामुळं नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

भंडाऱ्यातील जाहीर सभेत एका नेत्यानं सुषमा अंधारेंना त्यांच्या मुलीचा फोटो भेट स्वरुपात दिला. त्यावेळी चिमुकलीची भेट होत नसल्यानं तिचा फोटो पाहून सुषमा अंधारे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर त्यांनी सभेत जोरदार भाषण करत भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

भिडे गुरुजी अमृता फडणवीसांच्या मंगळसुत्रावरील वक्तव्यावर बोलतील का- अंधारे

टिकली लावली नाही म्हणून एका महिला पत्रकाराला बोलणारे संभाजी भिडे हे अमृता फडणवीसांच्या मंगळसुत्रावरील वक्तव्यावर बोलतील का?, असा सवाल केला आहे. मंगळसूत्र घातले की गळा आवळल्यासारखं वाटतं असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं होतं. त्यामुळं आता सातत्यानं संस्कृती जपण्याची भाषा करणारे भिडे गुरुजी त्यांना जाब विचारतील का?, असा प्रश्न करत सुषमा अंधारेंनी भिडे गुरुजींना टोला लगावला आहे.

WhatsApp channel