पुण्यातील कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या आगामी प्रकल्पांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढच्या पाच वर्षात तुम्हाला डिझेल गाड्या दिसणारच नाहीत तर शंभर टक्के इलेक्ट्रिक बसेस दिसतील. मला विश्वास आहे, इंजिनियरचं संशोधन फार महत्त्वाचं आहे. आम्ही भविष्यात नक्कीच अमेरिकेच्याही पुढे जावू, असा मला विश्वास आहे. त्याचबरोबर अटल सेतू जवळून १४ पदरी रस्ता तयार होणार आहे. मुंबईहून बेंगळुरूला जाणारा हा रस्ता पुण्यातील रिंग रोड मार्गे तयार केला जाणार आहे. या रस्त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ५० टक्क्यांनी कमी होणार असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.
सीओईपी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीने अभियंता दिनानिमित्त आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग नितीन गडकरी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. गडकरी म्हणाले, येत्या २५ वर्षांत सर्व वाहने जीवाश्म इंधनावर नाही तर विजेवर चालतील. आपले तंत्रज्ञान खूप फायदेशीर आहे. शिवाय कचऱ्याचा वापर आपण रस्ते बांधण्यासाठी करू शकतो असं ही ते म्हणाले. ज्यावेळी मी मंत्री झालो तेव्हा ऑटोमोबाईल इंडस्ट्री सात लाख कोटींची होती व आपला नंबर सातवा होता, आता आपण जपानला मागे टाकून जगात तिसरा नंबर मिळवला आहे. पहिल्या नंबरवरती अमेरिका असून त्यांची इंडस्ट्री ७८ लाख कोटींची तर चीनची ४४ लाख कोटी आहे. भारताची इंडस्ट्री साईज २२ लाख कोटी आहे. भारतातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री सर्वाधिक जीएसटी देणारा उद्योग आहे. यामध्ये साडेचार कोटी लोकांना रोजगार पुरवला असूनमी सर्व ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या मालकांना बोलावून विनंती केली की, आगामी पाच वर्षाच्या काळात या इंडस्ट्रीचा विस्तार ५५ लाख कोटींचा करा.
या इंडस्ट्रीमध्ये तंत्रज्ञान सारखं बदलत आहे. इलेक्ट्रिक ऑटो मोबाईलमध्ये लिथियम आयन बॅटरी अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या देशात जम्मू-काश्मीरमध्ये लिथियम आयनचा साठा मिळाला आहे, तो जगातला सहावा साठा आहे. लवकरच आपण खूप खूप मोठं काहीतरी करु दाखवू, यावर संशोधन सुरू आहे.
गडकरी म्हणाले, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जड वाहतूक सुरू आहे. या मार्गावर अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे अटल सेतूजवळ १४ लेनचा रस्ता तयार केला जाईल. जो पुढे पुण्याला आणि नंतर रिंगरोडमार्गे बेंगळुरूला जोडला जाईल. हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन ५० टक्क्यांनी ट्रॅफिक कमी होईल, असेही ते म्हणाले.