शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने जाण्यासाठी सर्वसामान्यांना उपयुक्त ठरणारे ‘शाश्वत भारत सेतू’ या केंद्राचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच नागपुरात उदघाटन झाले. शून्य कार्बन उत्सर्जन व शाश्वत भारताचे ध्येय साध्य करण्यात मदत करणारे हे एक फिरते अध्ययन व जागरूकता केंद्र आहे. पुण्यातील ‘द इको फॅक्टरी फाउंडेशन’ने या केंद्राची रचना केली आहे.
'शाश्वत भारत सेतू' या संस्थेने समाजातल्या महत्त्वाच्या मुद्दयाला स्पर्श केला असून याद्वारे आपले पर्यावरण आणि पर्यायाने वसुंधरेचे संवर्धन होणार आहे, अशी भावना नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. शाश्वत विकासाचे अशा प्रकारचे अपवादात्मक केंद्र नागपुरात सुरू केल्याबद्दल गडकरी यांनी यावेळी ‘द इको फॅक्टरी फाउंडेशन’चे अभिनंदन केले.
शाश्वत भारत सेतूच्या ‘वेस्ट टू वेल्थ’ या संकल्पनेचे गडकरी यांनी यावेळी कौतुक केले. या केंद्राने सूचविलेले उपाय केवळ पर्यावरणालाच लाभदायक ठरणारे नसून समुदायांसाठी उपजीविकेच्या संधीही निर्माण करणारे असल्याचे गडकरी म्हणाले. नेट झिरो कर्बचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे केंद्र संपूर्ण देशाला प्रेरित करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
पुणेस्थित ‘द इको फॅक्टरी फाउंडेशन’चे संस्थापक आनंद चोरडिया यांनी ‘वेस्ट टू वेल्थ’, जल व्यवस्थापन, ऊर्जा बचत यांसारख्या अनेक संकल्पना यावेळी तपशीला स्पष्ट करून सांगितल्या. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जन कसे कमी करावे, चक्राकार अर्थव्यवस्थेचे महत्त्व तसेच ग्रामीण, शहरी, औद्योगिक व व्यक्तिगत विभागांत शाश्वतता (Sustainability) कशी साध्य करावी हेही स्पष्ट केले आहे. शाश्वत भारत सेतू हा खऱ्या अर्थाने भारताला शून्य कार्बन उत्सर्जनाकडे घेऊन जाणारा पूल असल्याचे चोरडिया म्हणाले. हे केंद्र अनेकांना प्रेरित करेल आणि सर्वसामान्य नागरिक शाश्वत भविष्यकाळाकडे जाणाऱ्या प्रवासात सहभागी होऊ शकतील, अशी आशा चोरडिया यांनी व्यक्त केली.
शाश्वत जीवनशैलीच्या तत्त्वाचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट्य ठेवून पुण्यातील आनंद चोरडिया यांनी २०१६ साली ‘द इको फॅक्टरी फाउंडेशन’ची स्थापना केली होती. ग्रामीण, शहरी, औद्योगिक आणि व्यक्तिगत अशा चार प्रमुख विभागांमध्ये शाश्वतता साध्य करण्यासाठी ही संस्था कार्य करते आहे. जैवविघटनशील कचऱ्याचा वापर कसा करायचा, प्लास्टिक कसे रिसायकल करायचे याची माहिती हे केंद्र देते. हे फिरते केंद्र असून भारतभरात प्रवास करणार आहे.
संबंधित बातम्या