मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राणेंमुळं आदित्य ठाकरेंची बदनामी; केसरकरांच्या आरोपांवर नीतेश राणे म्हणाले…

राणेंमुळं आदित्य ठाकरेंची बदनामी; केसरकरांच्या आरोपांवर नीतेश राणे म्हणाले…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 06, 2022 02:49 PM IST

Nitesh Rane on Deepak Kesarkar allegations: दीपक केसरकर यांनी राणे कुटुंबीयांवर केलेल्या आरोपावर भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली.

Nitesh Rane - Deepak Kesarkar
Nitesh Rane - Deepak Kesarkar

Nitesh Rane on Deepak Kesarkar allegations: एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते व सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व राणे कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांवर आमदार नीतेश राणे यांनी आज थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यांनी या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडं व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं बोट दाखवलं.

भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत पुन्हा युती होऊ शकली असती. मात्र, नारायण राणे व त्यांच्या मुलांनी सुशांतसिंह प्रकरणात आदित्य ठाकरे यांची विनाकारण बदनामी केली. त्यामुळं उद्धव ठाकरे हे नाराज झाले होते. तसंच, शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. ठाकरे कुटुंबीयांवर प्रेम करणारे आम्ही सगळेच दुखावलो गेलो होतो. त्यामुळंच पुन्हा एकत्र येण्याची बोलणी पुढं सरकू शकली नाहीत. नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर तर युतीची शक्यताच संपुष्टात आली, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता.

केसरकर यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप व शिंदे गटातील मतभेद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. केसरकरांच्या या आरोपांनंतर नीतेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. एरवी प्रत्येक विषयावर ट्वीट करणाेर माजी खासदार नीलेश राणे व आमदारा नीतेश राणे यांनी केसरकरांच्या आरोपांवर मौन बाळगलं होतं. कर्जत येथील एक खूप प्रकरणाच्या निमित्तानं नीतेश यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला. मात्र, त्यांनी त्यावर थेट बोलणं टाळलं.

‘आमचे वरिष्ठ या संदर्भात जे बोलायचं, ते बोलतील. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री स्वत: याबाबत आवश्यक ती काळजी घेतील, असं नीतेश राणे म्हणाले. ‘हिंदुत्वासाठी सगळं माफ आहे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार असणं ही आज काळाची गरज आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना गेल्या अडीच वर्षांत हिंदूंना टार्गेट केलं जात होतं. सण-उत्सवही साजरे करता येत नव्हते. आज बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक मुख्यमंत्री आहे. उपमुख्यमंत्री हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळं आरोपांवर बोलण्यापेक्षा हे सरकार राहणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे,’ असं नीतेश म्हणाले.

WhatsApp channel