Nitesh Rane Akola Sabha Speech: अकोला जिल्ह्यातील निंबा फाटा येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या सभेत भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलीसांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्याविरोधात पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. नितेश राणे यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी. तसेच त्यांनी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबाची लेखी माफी मागावी, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी दिला आहे.
नितेश राणे म्हणाले होते की, “ पोलीस माझे काहीही करू शकणार नाहीत. पोलीस फक्त माझे भाषण रेकॉर्ड करू शकतात आणि घरी जाऊन बायकोला दाखवू शकतात. याव्यतिरिक्त काहीच करू शकणार नाही. आमच्या राज्यात आमच्यावर काय करु शकाल. त्यांना जागेवर राहायचे आहे. राजरोस पद्धतीने पाहिजे तिथे तुमच्या इथे अतिक्रमण सुरु आहे. जनतेने चिंता करण्याची गरज नाही. हे सरकार हिंदुत्ववाद्याचे आहे.सरकारमध्ये असे पर्यंत कुठल्याही हिंदूला कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही अशी ताकद आम्ही हिंदूंच्या मागे उभी केली आहे."
"पोलीस व्हिडिओ का काढतात, कदाचित हे त्याला कळाले नाही. तो शाळेत गेला नाही वाटते. आम्ही त्याचे व्हिडिओ बघायला रिकामे बसलो आहेत. आम्हाला चार पाच दिवसानंतर कळाले की, तो असा म्हणाला. लोकप्रतिनिधी पोलिसांना असे बोलतोय आमच्या कुटुंबला. तर, सर्वसामन्य लोक काय बोलतील. तू आहेस केवढा? बोलतोस किती? पायाखाली स्टूल घेऊन भाषणाला उभा राहतोस आणि पोलिसांबद्दल बोलतोस? अशा शब्दात पोलिसांच्या पत्नीने राणेंवर टीका केली.
आम्ही पोलीस पत्नी या निवेदनाद्वारे अशी नम्र विनंती करतो की, आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या जाहीर सभेमध्ये पोलीस व त्यांच्या कुटुंबाबाबत अपशब्द वापरले. यामुळे कर्तव्यदक्ष पोलिसांची खच्चीकरण झाले. नितेश राणे यांनी पोलीस पत्नीचा उल्लेख करून त्यांचा देखील भाषणात अवमान केला आहे. अशा वाचाळवीर लोक प्रतिनिधीवर योग्य ती कारवाई करावी. त्यांनी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबाची लेखी माफी मागावी. नाहीतर आम्हाला आमच्या न्यायासाठी व मानवीय हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढावे लागणार आहे.
"महिलांचा अपमान कुठे केला विचारणाऱ्या भाजप आमदारा विरोधात पोलिसांच्या पत्नींनी आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. भाजप आमदार सतत पोलिसांचे खच्चीकरण करतात, त्या पुढे जाऊन त्यांच्या पत्नी बद्दल बोलतात. कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा आज पोलिसांच्या पत्नींना द्यावा लागतो, यातून राज्यात पोलिसांची आणि कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे, हे राज्यातील जनतेला दिसत आहे. ज्या राज्यात पोलिसांच्या पत्नींना खालच्या भाषेत सत्ताधारी भाजप आमदार बोलत असतील तिथे इतर महिलांची सुरक्षा आणि सन्मानाबाबत काय स्थिती असेल हे अंदाज न घेतलेला बरा", विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.