Pune zika update : पुण्यात झिकाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रविवारी आणखी ९ जणांना झिकाची बाधा झाल्याचे तपासणी अहवालात आढळून आले आहे. त्यामुळे आता बाधित रुग्णांची संख्या ही ४८ झाली आहे. रविवारी आढळलेल्या ९ रुग्णांपैकी ७ रुग्ण पुणे महापालिका हद्दीत वाघोली, पुणे ग्रामीण आणि पुणे कँटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
जिल्ह्यात रविवारी झिकाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली. पुण्यात ९ नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या आता ४८ वर पोहोचली आहे, अशी माहिती पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. या नव्या रुग्णांमध्ये शिवणे येथील २५ वर्षीय गर्भवती महिलेचा समावेश आहे. या महिलेला ताप, पुरळ, अंगदुखी आणि डोकेदुखी अशी लक्षणे आढळल्याने तिचे नमुने २२ जुलै रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले होते. ही महिला २० आठवड्यांची गर्भवती आहे. शनिवारी तिच्या रक्ताचे नमुने हे पॉझीटीव्ह आल्याचे पालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले. गरोदर महिलांमध्ये झिका विषाणूमुळे जन्मजात मायक्रोसेफली, गिलेन-बॅरे सिंड्रोम आणि इतर न्यूरोलॉजिकल गुंतागुंत होऊ शकते, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोथरूड येथील आणखी एका ८० वर्षीय महिलेला झिका विषाणूची लागण झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १६ जुलै रोजी तिला ताप आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसू लागली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेला उच्च रक्तदाब व मधुमेह असून या महिलेचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.
कात्रज येथील आणखी एका दहा वर्षीय मुलाला शुक्रवारी झिका विषाणूची लागण झाली. या मुलाला ताप, अंगदुखी आणि डोकेदुखीची तक्रार असल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉ. देवकर यांनी दिली.
पुण्यातील एरंडवणे येथील ७४ वृद्ध महिला, लॉ कॉलेज रोड येथील ५४ वर्षीय महिला, कोंढवा येथील ३५ वर्षीय महिला आणि कोरेगाव पार्क येथील ४६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. वाघोली येथील २८ वर्षीय महिला आणि फातिमा नगर (पीसीबी हद्दी) येथील २९ वर्षीय महिलेचा समावेश आहे. शनिवारी एनआयव्हीकडून प्राप्त अहवालानुसार सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पुणे जिल्ह्यात २० जूनपासून झिका विषाणूचे ४८ रुग्ण आढळले असून त्यात १४ गरोदर महिलांचा समावेश आहे. या ४८ रुग्णांमध्ये मनपामधील ४४, पुणे ग्रामीणमधील ३ (भूगाव, सासवड आणि वाघोली येथील प्रत्येकी एक) आणि पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीतील एका रुग्णाचा समावेश आहे. आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगितले की, यावर्षी महाराष्ट्रात झिका विषाणूसंसर्गाचे सर्वाधिक ५४ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या संसर्गाचा प्रसार करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संक्रमित एडिस डासाच्या चाव्याद्वारे झिका विषाणूचा प्रसार होतो. झिकाची लागण झालेले बहुतेक लोक एकतर लक्षणे नसलेले (८०% पर्यंत) राहतात किंवा ताप, पुरळ अंगदुखी आणि सांधेदुखीची अशी रुग्णांची लक्षणे आहेत.
संबंधित बातम्या