Vasant More : वसंत मोरे राष्ट्रवादी कार्यालयात आले मात्र प्रवेश न करताच माघारी, कारण काय?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vasant More : वसंत मोरे राष्ट्रवादी कार्यालयात आले मात्र प्रवेश न करताच माघारी, कारण काय?

Vasant More : वसंत मोरे राष्ट्रवादी कार्यालयात आले मात्र प्रवेश न करताच माघारी, कारण काय?

Mar 14, 2024 07:31 PM IST

Vasant More Pune Politics : निलेश लंके यांच्यासोबत मनसे सोडून आलेले पुण्यातील धडाडीचे नेते वसंत मोरेही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा होती. मात्र वसंत मोरे पक्षप्रवेश न करताच माघारी परतले आहेत. याची कारणही त्यांनी सांगितले आहे.

वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश न करताच माघारी परतले
वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश न करताच माघारी परतले

Vasant More : पुणे शहरातील फायरब्रँड नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला जय महाराष्ट्र ठोकल्यानंतर ते शरद पवारांची राष्ट्रवादी किंवा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या ३ वर्षापासूनची मनातील खदखद वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. त्यातच आज सायंकाळच्या सुमारास वसंत मोरे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Sharad Pawar office) कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे आता वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र प्रवेश न करताच वसंत मोरे राष्ट्रवादीतून माघारी परतले आहेत.

आज अजित पवार गटातील नेते व पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला. लंके राष्ट्रवादीतील फुटूनंतर अजित पवारांसोबत गेले होते. निलेश लंके अहमदनगर मतदारसंघातून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेल्याने निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

शरद पवारांच्या उपस्थितीत लंके यांनी पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसे सोडलेले नेते वसंत मोरे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे वसंत मोरे हे सुद्धा आता शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता होती, पण त्यांनी प्रवेश केला नाही.

राष्ट्रवादी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे म्हणाले की, मी पक्षप्रवेशासाठी आलो नव्हतो. पुणे मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासंबधात शरद पवारांच्या भेटीसाठी आलो आहे. मी पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहे, त्यासाठीच मी शरद पवारांना भेटण्यासाठी आलो होतो. सुप्रिया सुळे यांनी आजच भेटीची वेळ दिली होती. त्यांनी मला आज याठिकाणी बोलवलं त्यामुळे कार्यालयात आलोय. माझी आणि अमोल कोल्हे यांची गेल्या ५ वर्षांपासून चांगली मैत्री आहे, असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्याशी पक्षप्रवेशाबाबत चर्चा झालेली नाही.

Whats_app_banner