पुण्यातील कल्याणीनगर येथे मोटारसायकलला धडक देऊन दोन जणांचा बळी घेणाऱ्या पोर्शे कार या हायप्रोफाईल प्रकरणातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने अपघाताच्या वेळी आपला फॅमिली ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचा दावा केला आहे. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या दोन मित्रांनी त्याच्या दाव्याचे समर्थन केले आहे, असे इंडिया टुडेने म्हटले आहे.
रविवारी झालेल्या भीषण अपघाता दरम्यान कारमध्ये आरोपीसोबत असलेला त्याचा मित्र आणि फॅमिली ड्रायव्हरची पोलिसांनी गुरुवारी चौकशी केली. चालकाने आपल्या पहिल्या जबाबात असा दावा केला होता की, जेव्हा हा भीषण अपघात झाला तेव्हा तो गाडी चालवत होता. तसेच अल्पवयीन मुलाच्या वडिलांनीही असा दावा केला आहे की, त्या दुर्दैवी रात्री फॅमिली ड्रायव्हरच पोर्शे कार चालवत होता.
पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील आणि अनेक कर्मचारी तसेच मुंढवा परिसरातील दोन मद्यविक्री आस्थापनांच्या मालकाविरोधात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपी मुलाच्या आजोबांची चौकशी केली. काही तथ्यांची पडताळणी करण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयात आजोबांची मुलाशी भेट झाली.
त्वरित जामीन आणि पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेवरून झालेल्या संतापानंतर बाल न्याय मंडळाने (जेजेबी) बुधवारी अल्पवयीन मुलाला बाल सुधार गृहात पाठवले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, निरीक्षण गृहात असताना अल्पवयीन मुलाची मानसशास्त्रीय तपासणी केली जाईल. पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), ३०४ ए, २७९ (बेदरकारपणे वाहन चालविणे) आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमान्वये एफआयआर दाखल केला आहे.
दम्यान, बांधकाम व्यवसाय करणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या आजोबांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. २००९ मध्ये शिवसेनेचे नगरसेवक अजय भोसले यांच्या हत्येसाठी छोटा राजनच्या टोळीला सुपारी दिल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आजोबांवर आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, भावासोबत मालमत्तेच्या वादातून मध्यस्थी अयशस्वी झाल्यानंतर आजोबांनी भोसले यांच्या हत्येसाठी छोटा राजनला कॉन्ट्रॅक्ट दिले होते.
२००९ मध्ये छोटा राजनने दोन भावांमधील (आरोपीचे आजोबा आणि त्याचे भाऊ) मालमत्तेच्या वादात हस्तक्षेप करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. मी नकार दिल्याने बिल्डरने राजनला कंत्राट दिले आणि त्यानुसार ११ ऑक्टोबर २००९ रोजी माझ्यावर हल्ला करण्यात आला, असे भोसले यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.