Maharashtra Government News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सात दिवस झाले आहेत. या निवडणुकीत महायुती आघाडीने घवघवीत यश मिळविले आहे. मात्र, नव्या सरकार स्थापनेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. २६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल, असे यापूर्वी सांगण्यात आले होते. त्यानंतर काही नेत्यांनी २ डिसेंबरची तारीख दिली. येत्या ५ डिसेंबरला महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होईल, असा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे. देवेंद्र फडणवीस हे पुढचे मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचेही या नेत्याने सांगितले आहे.
भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती असलेल्या महायुतीने २० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २३० जागा जिंकून महाराष्ट्रात सत्ता कायम राखली. भाजप १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर शिवसेना (५७ जागा) आणि राष्ट्रवादी (४१ जागा) यांचा क्रमांक लागतो. मात्र, २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होऊनही मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
शिंदे, फडणवीस आणि पवार यांनी गुरुवारी रात्री उशिरा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत चर्चा केली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी रवाना झाल्याने शुक्रवारी होणारी महायुतीची महत्त्वाची बैठक पुढे ढकलण्यात आली.
नव्या सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबररोजी होणार आहे, अशी माहिती भाजप नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. पक्षाचे ज्येष्ठ नेते फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मात्र, भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पुढील मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप नेतृत्वाच्या निर्णयाला आपला पूर्ण पाठिंबा असून या प्रक्रियेत अडथळा आणणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे.
या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहतील. शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यातही जल्लोष करा, अशा सूचना चंद्रशेखर बानवकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात.