महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ तीन वेळा पुढे ढकलण्यात आलेली पूर्व परीक्षा आता रविवार १ डिसेंबर रोजी होत आहे. या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी उमेदवाराचे प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ यापूर्वी २५ ऑगस्ट रोजी घेतली जाणार होती मात्र आयबीपीएस परीक्षा त्याच दिवशी आल्याने राज्यसेवा परीक्षा स्थगित करण्यात आली होती.
२५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्रे वितरित करण्यात आली होती. मात्र परीक्षा ऐनवेळी रद्द केल्य़ाने ही प्रवेशपत्रे बाद झाली आहेत. आता १ डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांना नव्याने प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जुन्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
१ डिसेंबर २०२४ रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास आधी संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे, तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास आधी परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. तसेच परीक्षेवेळी उमेदवारांनी एमपीएससीच्या मार्गदर्शक सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे.
निर्धारीत वेळेनंतर परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात एमपीएससीची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.
MPSC राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये ४०० गुणांसाठी १०० प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश (१/४) मार्क कमी होतात. पेपर १ (GS) मध्ये इतिहास, भूगोल, पर्यावरण, राजशास्त्र, अर्थशात्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोड़ी, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय आहेत तर पेपर 2 मध्ये (CSAT) आहे.
· नागरी सेवा पूर्व परीक्षा ही वस्तूनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
· प्रत्येक पेपरचा कालावधी हा २ तासाचा असेल
· प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
· परीक्षेचे मध्यम मराठी व इंग्रजी असेल
· पेपर क्रमांक २ (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) असून अर्हताप्राप्त करण्यासाठी किमान ३३% गुण मिळविणे आवश्यक राहील.