मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दहा तोळे सोने असलेली पर्स हरवली; पोलिसांनी २ तासांत शोधून आणली

दहा तोळे सोने असलेली पर्स हरवली; पोलिसांनी २ तासांत शोधून आणली

HT Marathi Desk HT Marathi
May 17, 2023 07:59 PM IST

Nerul police trace missing bag in 2 hours: नवी मुंबई पोलिसांची सतर्कता आणि तपासादरम्यान घेतलेले तत्पर निर्णय यामुळे एका महिलेची १० तोळे सोने आणि रोख रक्कम असलेली पर्स अगदी दोन तासाच्या आत सापडल्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.

Navi Mumbai: Police traces missing bag in two hours
Navi Mumbai: Police traces missing bag in two hours

नवी मुंबई पोलिसांची सतर्कता आणि तपासादरम्यान घेतलेले तत्पर निर्णय यामुळे एका महिलेची १० तोळे सोने आणि रोख रक्कम असलेली पर्स अगदी दोन तासाच्या आत सापडल्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे. ऑटो रिक्शामध्ये महिला ही पर्स विसरली होती. पोलिसांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर जलदगतीने तपास करत परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून हरवलेल्या पर्सचा दोन तासांच्या आत शोध लावला.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

नवी मुंबईतील जुईनगर येथे राहणारी सुरेखा फुसे ही महिला एसटी बसने नेरुळ येथील एल पी बस स्टॉपवर उतरली होती. नेररुळहून जुईनगरला येण्यासाठी या महिलेने ऑटोरिक्शा पकडली. परंतु जुईनगरमध्ये रिक्शातून उतरल्यानंतर १० तोळे सोनं आणि १६ हजाराची रोख रक्कम असलेली एक पर्स दिसत नसल्याचे लक्षात येताच फुसे या महिलेला धक्का बसला. सुरेखा फुसे यांनी थेट नेरुळ पोलिस स्टेशन गाठत पर्स हरवल्याची तक्रार दाखल केली.

पर्समध्ये सोने आणि रोख रक्कम असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी फार वेळ न दवडता थेट नेरुळच्या एलपी बस स्टॉपवर धाव घेऊन महिलेने प्रवास केलेल्या रिक्शाबाबत चौकशी सुरू केली. पोलिसांनी लगेच बस स्टॉपवरील सीसीटीव्ही तपासून रिक्शा ओळखून ड्रायव्हरला गाठले. परंतु आपल्या रिक्शामध्ये कोणत्याही प्रवाशाची पर्स राहिली नसल्याचं रिक्शा चालकाने सांगितल्याचे नेरुळ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन खाडे यांनी सांगितले.

रिक्शामध्ये बॅग न सापडल्याने पोलिसांनी नेरुळ बस स्टॉप ते जुईनगर या संपूर्ण प्रवास मार्गावरील सीसीटीव्ही तपासायचे ठरवले. यादरम्यान पोलिसांना एका सीसीटीव्हीमध्ये महिला प्रवास करत असलेल्या रिक्शातून एक बॅग बाहेर पडत असल्याचे आणि नंतर एक अनोळखी व्यक्ती ती बॅग उचलून घेऊन जात असल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी त्या परिसरातील इमारतींच्या सुरक्षा रक्षकांची चौकशी केली. या रिक्शातून पडलेली बॅग एका सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने उचलून सुरक्षीत ठेवली होती. ही बॅग आपण स्वतःहून पोलीस स्टेशनला जाऊन सुपूर्द करणार होतो, अशी माहिती या सुरक्षा रक्षकाने दिली. दरम्यान, दोन तासांच्या आत १० तोळे सोनं आणि रोख रक्कम असलेली पर्स पोलिसांनी शोधून दिल्यामुळे महिलेला हायसे वाटले. नवी मुंबई पोलिसांच्या या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होत आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या