NEET Paper Leak Case: वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे (NEET) पेपर फुटल्या प्रकरणी देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रोज नवे नवे खुलासे पुढे येत आहेत. अशातच या पेपर फूटी प्रकरणी बिहार कनेक्शन सोबतच राज्याचेही कनेक्शन असल्याचे पुढे आले आहे. नांदेड एटीएस पथकाने शनिवारी लातूर येथे दोन ठिकाणी छापेमारी केली असून या पेपरफूटी प्रकरणी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.
नीट यूजी पेपर फूटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी एनटीएच्या संचालकांना बडतर्फ करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असतांना सीबीआयच्या पथकाला बिहार कनेक्शन मिळाले होते. यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. नांदेड एटीएसने शुक्रवारी लातूर येथे कारवाई करत दोन शिक्षकांना अटक केली आहे. यातील एक शिक्षक हा लातूर तर दूसरा हा सोलापूर येथे काम करतो. दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.
संजय तुकाराम जाधव व जलील उमरखाँ पठाण अशी अटक करण्यात आलेल्या या या शिक्षकांची नावे आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेसाठी देशभरातील मुले तयारी करत असतात. दरम्यान, . लातूरमध्येही नीट व जेईईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मोठ्या प्रमाणात खसगी कोचिंग क्लासेसची संख्या या ठिकाणी आहे. याच दृष्टीने एटीएसचे पथक हे तपास करत असतांना शनिवारी रात्री वरील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील असून ते सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. तर लातूरच्या येथील अंबाजोगाई रोड येथे राहणारे जलील उमरखाँ पठाण हे लातूर येथील कातपूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. हे दोघेही लातूर येथे खाजगी कोचिंग क्लासेस चालवत होते. सध्या त्यांना पथकाने नांदेड येथे नेले असून त्या ठिकाणी त्यांची चौकशी सुरू आहे.
रविवारी (३० जून) रोजी होणारी NEET-PG प्रवेश परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. या परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. मंत्रालयाकडून जारी निवेदनात म्हटले आहे की, काही स्पर्धा परीक्षांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होत आहेत. या घटना लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मेडिकलसाठी राष्ट्रीय परीक्षा बोर्डाकडून आयोजित एनईईटी-पीजी प्रवेश परीक्षा प्रक्रियेचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या