Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्य घरात झालेल्या हल्ल्यामुळं सगळेच हादरून गेले आहेत. हा हल्ला चोरानं केल्याचं बोललं जात असलं तरी अद्याप ठोस कोणतंही कारण समोर आलेलं नाही. त्यामुळं संभ्रमाचं वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे आमदार जितेंद्र आव्हाड याबाबत वेगळाच संशय व्यक्त केला आहे. यामागे धार्मिक कट्टरतावादी असू शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडिया अकाऊंट 'एक्स'वर आव्हाड यांनी या संदर्भात पोस्ट केली आहे. 'सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीनं सैफ अली खान यांना टार्गेट केलं जात होतं, ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे? या दिशेनंही तपास होणं आवश्यक आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
सैफ अली खान यांच्यावर एकूण सहा वार करण्यात आल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे. त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचं समजतं. एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे. त्यामुळं त्यांच्या मणक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता वार हा जिवे मारण्याच्या हेतूनंच करण्यात आल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
सैफ अली खान हे भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणार्या पद्श्री पुरस्कारानं सन्मानित आहे, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं आहे.
चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ अली खान यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं. सध्या मुंबई पोलिसांची तपासाची चक्रं फिरू लागली आहेत. सीसीटीव्ही फूटेज तपासली जात आहेत. या हल्ल्यामागे नेमका काय हेतू होता याचीही चौकशी केली जात आहे.
संबंधित बातम्या