Balasaheb Thackeray Jayanti : महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात अनेक दशकं झंझावात निर्माण करणारे महान नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. या निमित्तानं शिवसेनाप्रमुखांना विविध क्षेत्रांतून मानवंदना दिली जात आहे. एकेकाळी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले, पण तरीही राजकारणापलीकडं जाऊन मैत्र जपलेले दिग्गज नेते शरद पवार यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.
शरद पवार यांनी बाळासाहेबांचा फोटो ट्वीट करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. 'प्रभावी व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध व्यंगचित्रांच्या माध्यमातून 'मार्मिक' भाष्य केलं. कुशल संघटक व मुत्सद्दी राजकारणी असलेल्या बाळासाहेबांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी लढा दिला. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसांच्या स्वाभिमान जागृतीसाठी कायम प्रयत्नशील राहिलेले शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन,' असं शरद पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केलं आहे. 'लोककल्याणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासाप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी बाळासाहेब ओळखले जातात. त्यांचा सर्वत्र आदर आणि स्मरण केलं जातं. त्यांच्या मूळ विचारांबद्दल ते ठाम होते आणि भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी त्यांनी नेहमीच योगदान दिलं, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राजकीय योगदान अजोड आहे. शिवसेना ही संघटना स्थापन करून त्यांनी केवळ मराठी माणसाला न्याय्यहक्क मिळवून दिले, असं नव्हे तर राजकारणाच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य माणसाला एक चेहरा मिळवून दिला. बाळासाहेबांच्या सहवासात येऊन मोठे झालेले आणि आज राज्याच्या राजकारणात चमकत असलेले अनेक नेते आहेत. यातील अनेक नेते कालांतरानं शिवसेनेपासून दूर गेले, मात्र बाळासाहेबांचे ऋण ते कधीच विसरले नाहीत.
संबंधित बातम्या