Sharad Pawar News : ‘देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्याबद्दल काही वक्तव्यं केली आहेत. त्यांना भाषणं करण्याचा अधिकार आहे. पण ते करताना थोडीफार माहिती घेऊन बोललं पाहिजे. अर्थात त्यांच्या टिकेची नोंद घ्यावी इतकी त्यांची लेव्हल नाही, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ‘कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी' अशी मराठी म्हणही शरद पवार यांनी यावेळी ऐकवली.
'देशाच्या गृहमंत्रीपदी एकेकाळी सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण होते. या सर्वांनी पदाची प्रतिष्ठा वाढवण्याचं अतिशय मोलाचं काम केलं. गुजरातनंही देशाला उत्तम प्रशासक दिले. पण यापैकी कोणालाही कधी त्यांच्या राज्यातून तडीपार केलं गेलं नव्हतं. तो प्रसंग कधी या राज्यकर्त्यांवर आला नाही. आजच्या गृहमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर मला ती आठवण होतेय, असं ते म्हणाले.
'देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषण केलं. भाषण करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण थोडीफार माहिती घेऊन भाषणं केली तर लोकांच्या मनात शंकेची स्थिती निर्माण होत नाही. त्यांना माझी माहिती १९७८ सालापासून झाली. १९७८ साली ते राजकारणात कुठं होते मला माहीत नाही. पण ७८ साली मी मुख्यमंत्री होतो. माझ्या मंत्रिमंडळात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, हशू अडवाणी, प्रमिलाताई आदी कर्तृत्वान लोक होते. पुलोद सरकारची माहिती घेतली तर यातील सगळ्यांनी राज्यासाठी चांगलं योगदान दिलं. जनसंघाची पार्श्वभूमी असलेल्यांनी माझ्यासोबत काम केलं. संघात राहून वसंतराव भागवत, प्रमोद महाजन यांनी आम्हाला सहकार्य केलं. ही सर्व नेतृत्वाची फळी भाजपनं ७८नंतर दिली. नंतरच्या काळात देशात वेगवेगळ्या पक्षांची सत्ता होती. पण राजकीय नेत्यांमध्ये सुसंवाद होता. वाजपेयी आणि आडवाणी यांच्यासारखे कर्तृत्ववान लोक होते. त्यांनी अतिरेकी भूमिका घेऊन समाजकारण किंवा राजकारण केलं नाही. हल्लीच्या गृहमंत्र्यांनी जे भाषण केलं. माझ्यावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जे भाष्य केलं त्यावर न बोललं बरं. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी अशी मराठी म्हण आहे, असा बोचरी टीका शरद पवार यांनी केली.
'जेव्हा हे गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, अन् त्यांना मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी केली होती. याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे जास्त सांगतील. आता याची पातळी किती घसरली हे सांगायला ही पुरेशी विधानं आहेत. त्यांच्या वक्तव्याची त्यांच्या पक्षात किती नोंद घेतली जाते माहीत नाही, असंही शरद पवार म्हणाले.
संबंधित बातम्या