Maharashtra Assembly Elections 2024 : ‘पंतप्रधान पदावरील व्यक्तीनं संपूर्ण देशाचा विचार करायला हवा. पण, नरेंद्र मोदी हे फक्त गुजरातसाठी काम करतात. तेच करायचं असेल तर पंतप्रधान कशाला झालात, तिथं जाऊन मुख्यमंत्री व्हा,’ असा बोचरा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नरेंद्र मोदी यांना हाणला.
बारामती विधानसभा मतदारसंघातील सुपा इथं युगेंद्र पवार यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला.
'सध्याचे पंतप्रधान हे फक्त एका राज्यासाठी काम करताना दिसतात. रतन टाटा यांच्या डोक्यात एक विमान निर्मितीचा कारखाना काढायचा विचार होता. पण तो कुठं उभारावा याचा ते विचार करत होते. त्यांच्या डोळ्यापुढं बिहार आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये होती. आम्ही त्यांना जाऊन भेटलो व त्यांना महाराष्ट्रासाठी आग्रह धरला. मात्र सरकार बदललं आणि नागपूरला होणारा हा कारखाना गुजरातला गेला. मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काय जादू केली माहीत नाही, असं शरद पवार म्हणाले.
त्याच पद्धतीनं वेदांता फॉक्सकॉन हा कारखाना महाराष्ट्रात उभा राहणार होता. नरेंद्र मोदी यांनी वेदांताच्या मालकाशी चर्चा केली आणि तो कारखाना गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय झाला. मी गुजरातच्या विरोधात नाही. सरकारनं गुजरातचं कल्याण करावं, पण महाराष्ट्राचं नुकसान करू नये. गुजरातचंही कल्याण करा. महाराष्ट्राचंही करा आणि इतर राज्यांचंही करा. देशाचा पंतप्रधान एका राज्याचं काम करत असेल तर ते देशाच्या हिताचं नाही. राज्यांच्या हिताचं नाही, असं पवार म्हणाले.
'अनेक राज्यांमध्ये तरुणांच्या हाताला काम नाही. त्यासाठी समतोल प्रगती गरजेची आहे. मात्र आमचे राज्यकर्ते इथल्या राज्यातील लोकांच्या हितासाठी धमक दाखवत नाहीत. त्यामुळं आमची कामं दुसरीकडं जातात. हे थांबवायचं असेल तर इथली सत्ता बदलावी लागेल, असं शरद पवार म्हणाले.