Sharad Pawar Chiplun Rally Speech : रत्नागिरीतील चिपळूण येथील जाहीर सभेत बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज नारायण राणे यांच्या मुलांवर जोरदार टीका केली. ‘महाराष्ट्राच्या कुठल्याही मुख्यमंत्र्याची पुढची पिढी अशा प्रकारची झालेली मी पाहिलेली नाही,’ अशी जळजळीत टीका शरद पवार यांनी केली.
नारायण राणे यांचे धाकटे चिरंजीव आमदार नीतेश राणे हे सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आवाज उठवत असतात. अनेक जाहीर सभांमध्ये ते थेट मुस्लिमांबद्दल बोलतात. त्यामुळं सामाजिक तणाव निर्माण होण्याची भीती आहे. याच अनुषंगानं शरद पवार यांनी जाहीर सभेत भाष्य केलं.
'रत्नागिरी हा जुना जिल्हा आहे. या जुन्या जिल्ह्यात एक मुख्यमंत्री होते. ते सिंधुदुर्गातले होते. मीही मुख्यमंत्री होतो. माझ्या घरात एक मुलगी आहे. चांगलं काम करण्याच्या बाबतीत आज देशाच्या संसदेत तिचा लौकिक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यानं दिलेल्या एका मुख्यमंत्र्याबरोबर मी स्वत:ही काम केलंय. त्यांच्यासोबत मीही काम केलंय. त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीनं बोलतात, ज्या पद्धतीनं टीका-टिप्पणी करतात ते योग्य नाही. महाराष्ट्राच्या कुठल्याही मुख्यमंत्र्याची पुढची पिढी अशी झालेली मी पाहिलेली नाही, असं पवार म्हणाले.
'राणेंच्या मुलांची भाषा कशा प्रकारची आहे. समाजात सगळ्या जाती-धर्माचे लोक असतात. भारत हा सर्व जाती-धर्माच्या लोकांचं राष्ट्र आहे. इथं हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आहेत. असं असताना एका केंद्रीय मंत्र्याची मुलं मुस्लिम समाजाविषयी चुकीची भाषणं पुन्हा-पुन्हा करतात. त्यांना आवर घालण्याऐवजी ते टीव्हीवर दिसतील ह्याची काळजी घेतली जाते हे कळण्यापलीकडचं आहे. याचा अर्थ सत्ता डोक्यात गेलेली आहे आणि जेव्हा सत्ता डोक्यात जाते तेव्हा लोक एकत्र येऊन संबंधितांना जागा दाखवतात, असा इशारा पवार यांनी दिला.
'पंतप्रधानपद ही एक संस्था आहे. तिचा सन्मान राखणं ही तुमची-आमची जबाबदारी आहे. ती आम्ही घेतो. मात्र, पंतप्रधानांनीही ती घेतली पाहिजे. सामान्य माणसाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. पंतप्रधान नुकतेच काश्मीरमध्ये निवडणूक प्रचारासाठी गेले होते. तिथं ते म्हणाले, काँग्रेस पक्ष हा दहशतवाद्यांचा, गुंडांचा आणि भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे. खरंतर काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केलाय. गांधी-नेहरू कुटुंबाचंही देशाच्या विकासात योगदान आहे, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मात्र ते विकासात्मक किंवा धोरणात्मक बोलायचं सोडून हे भलतंच बोलतात. ते पाहून राणेंच्या मुलांना दोषा द्यावा की नाही हे मला कळत नाही, असा टोला पवारांनी हाणला.