Sachin dodke in Khadakwasla : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं असून निकाल शनिवारी जाहीर होणार आहे. त्यामुळं उमेदवारांमध्ये धाकधूक असताना खडकवासला विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांच्या समर्थकांनी कमालच केली आहे. निकालाआधीच विजयी मिरवणूक काढली आहे.
खडकवासला मतदारसंघात सचिन दोडके, भाजपचे भीमराव तापकीर आणि मनसेचे मयुरेश वांजळे यांच्यात प्रमुख लढत होती. भाजपचे भीमराव हे तिथले विद्यमान आमदार असून त्यांच्यावर विश्वास दाखवून भाजपनं त्यांना पुन्हा तिकीट दिलं होतं. सचिन दोडके यांनी २०१९ मध्ये निवडणूक लढवली होती, मात्र अवघ्या २५०० मतांनी त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत मनसेने माजी आमदार रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळं ही तिरंगी लढत चुरशीची होणार हे स्पष्ट होते.
मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये देखील निकाल नेमके कसे लागतील हे स्पष्ट झालेलं नाही. असं असलं तरी सचिन दोडके यांच्या समर्थकांना विजयाचा शंभर टक्के विश्वास आहे. त्यामुळंच त्यांनी निकालाआधीच उमेदवाराची विजय मिरवणूक काढली. दोडके यांच्या विजयाचे पोस्टरही समर्थकांनी परिसरात लावले आहेत. दोडके यांना खांद्यावर घेत वाद्यांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली. दोडके हे सुद्धा आमदार झाल्याच्या अविर्भावात लोकांचं अभिवादन स्वीकारत होते. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी… अशा घोषणाही यावेळी त्यांच्या समर्थकांनी दिल्या.
सचिन दोडके यांच्या या विजयी मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापूर्वी २०१९ मध्येही सुद्धा सचिन दोडके यांच्या समर्थकांनी निकालापूर्वीच त्यांच्या विजयाचं अभिनंदन करणारे पोस्टर लावले होते. मात्र, निकाल आल्यावर त्यांची निराशा झाली. अवघ्या अडीच हजार मतांच्या फरकानं त्यांचा पराभव झाला. यावेळी त्यांनी पूर्वीपेक्षा अधिक ताकदीनं निवडणूक लढविल्याचं बोललं जात आहे. यामुळे त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना आपणच विजयी होणार असा विश्वास आहे. मात्र, भीमराव तापकीर यांच्या रूपानं त्यांच्यासमोर तगडं आव्हान आहे. मयुरेश वांजळे हेही प्रबळ दावेदार आहेत.
कोल्हापुरातील कागलचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ आणि शिवसेनेच्या समरजीत घाटगे यांच्यात चुरशीची लढत आहे. मात्र, मतदान पार पडल्यानंतर मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून विजयाचा आनंद साजरा केला. मुश्रीफ यांनी उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलनं कॉलर उडवून कार्यकर्त्यांना प्रतिसाद दिला.