Shirur Lok Sabha News : म्हाडाचे अध्यक्षपद देऊन शिवाजीराव आढळराव पाटील यांची बोळवण केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पावर गटाला देण्याचे निश्चित झाले आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. तर शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते. शिरुर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपचे प्रदीप कंद आणि विलास लांडे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस कुणाला तिकीट देणार या कडे लक्ष लागून आहे.
शिरूर लोकसभा जागेवरून गेल्या काही दिवसांपासून तिढा सुरू होता. ही जागा लढवण्यास अजित पवार गट आग्रही होते. तर शिवसेनेकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. एवढेच नाही तर ही जागा शिवसेनाच लढणार तसेच मुख्यमंत्र्यांनी या बाबत सांगितले असल्याचे देखील पाटील म्हणाले होते. मात्र, त्यांना मध्येच म्हाडाचे अध्यक्षपद देण्यात आल्याने त्यांचा पत्ता कट झाला अशी चर्चा सुरू होती. दरम्यान, यानंतर पाटील यांची भाषा देखील मवाळ झाली होती. मुख्यमंत्री जे सांगेल त्या पक्षाला पाठिंबा देईल अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
दरम्यान, अजित पवार ही शिरूर लोकसभेच्या जागेसाठी आग्रही होते. या संदर्भात मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकी दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटील आणि इतर नेत्यांना बाहेर ठेवून बंद दाराआड दिलीप वळसे-पाटील आणि अजित पवार यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. दरम्यान, या नंतर शिवाजीराव आढळराव पाटील हे वर्षा बंगल्यावरुन बाहेर पडले. या बैठकीत ही जागा राष्ट्रवादीला देण्यास एकमत झाले. यामुळे आढळराव पाटील हे नाराज असल्याची चर्चा आहे.
शिरूर लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून खासदार अमोल कोल्हे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यांनी तयारी सुद्धा केली आहे. मात्र, आता अजित पवार गटाकडून उमेदवाराची शोधाशोध सुरू आहे. हवेली तालुक्यातील बडे नेते असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी भाजपला राम राम करून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना शिरूर मतदार संघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. तर विलास लांडे हे देखील या मतदार संघातून लढण्यास इच्छुक आहेत. तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना घडयाळ चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता देखील आहे.
संबंधित बातम्या