
Rohit Pawar questions Dilip Walse Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांच्यासोबत राहिलेले कर्जत-जामखेडचे आमदार व पवारांचे नातू रोहित पवार हे आता जोमानं कामाला लागले आहेत. त्यांनी आता राष्ट्रवादीच्या बंडखोरांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. त्यात शरद पवार यांचे सर्वात विश्वासू असलेल्यांचा समावेश आहे. रोहित पवारांनी पहिला वार दिलीप वळसे पाटील यांच्यावर केला आहे.
रोहित पवार यांनी आज सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. त्यात शरद पवार यांनी वळसे-पाटलांना आजवर दिलेल्या पदांची यादीच दिली आहे. अजून काय पाहिजे होतं, असा सवाल त्यांनी वळसे-पाटलांना केला आहे.
रोहित पवार यांनी दिलीप वळसे पाटलांना काही प्रश्नही विचारले आहेत. 'वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. 'केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती, असं रोहित पवार यांनी म्हटलंय.
‘प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूनं संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमानं आणि नव्या ताकदीनं उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का?,’ असा रोकडा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. तुम्हाला काय केलं होतं कमी? का पत्करलीत गुलामी? असा हॅशटॅगही त्यांनी दिला आहे.
शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून राजकीय प्रवास सुरू केलेले वळसे-पाटील जुन्नर तालुक्यातील आंबेगाव मतदारसंघातून सात वेळा आमदार झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष व गृह खात्यासह सहा वेगवेगळ्या खात्याची मंत्रिपदं त्यांनी भूषवली आहेत. शरद पवार यांच्या जवळीकीमुळंच त्यांना हे लाभ मिळाले आहेत. रोहित पवार यांनी हीच यादी शेअर केली आहे. अजून काय पाहिजे होतं? हे सगळं वाचल्यानंतर, असा अन्याय आमच्यावरही झाला पाहिजे, असं लोक म्हणतील, असा खोचक टोलाही रोहित पवार यांनी हाणला आहे.
संबंधित बातम्या
