Sharad Pawar : एका व्यक्तीच्या राजवटीचे दिवस संपले, लोकसभा निकालाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार - शरद पवार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : एका व्यक्तीच्या राजवटीचे दिवस संपले, लोकसभा निकालाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार - शरद पवार

Sharad Pawar : एका व्यक्तीच्या राजवटीचे दिवस संपले, लोकसभा निकालाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार - शरद पवार

Updated Jun 12, 2024 08:35 PM IST

Sharad Pawar On modi : मोदींची हमी संपली असून ती संपवण्याची ताकद जनतेकडे आहे, असा टोला शरद पवार यांनी भाजपला लगावला. तसेच लोकसभा निकालाची पुनरावृत्ती विधानसभेला होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्ती केला.

शरद पवारांची मोदीवर टीका
शरद पवारांची मोदीवर टीका (ANI file)

भाजपला अन्य पक्षांच्या मदतीशिवाय केंद्रात सरकार स्थापन करता आले नसते, त्यामुळे एका व्यक्तीच्या राजवटीचे दिवस संपले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप व पंतप्रधान मोदींवर केली. केंद्रात युतीचे सरकार आल्याने मोदी गॅरंटी आता संपुष्टात आली असून मतदारांच्या ताकदीमुळे हा बदल शक्य झाला आहे. लोकसभा मतदारसंघातील पुरंदर तालुक्यात पाणीटंचाईपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

निवडणुका संपल्या आहेत आणि केंद्रात सरकार स्थापन झाले आहे. गेल्या १० वर्षांत सरकार एक व्यक्ती होते, पण आता व्यवस्था एका व्यक्तीच्या राजवटीतून मुक्त झाली आहे. यावेळी इतरांच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात आले आहे.

परिस्थिती अशी होती की बिहार (नितीशकुमार) आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या (एन. चंद्राबाबू नायडू) मदतीशिवाय सरकार स्थापन झाले नसते. त्यांच्या मदतीने सरकार स्थापन झाले आहे, म्हणजे एका व्यक्तीचे सरकार चालवण्याचे दिवस गेले. याचा अर्थ मोदींची हमी, ज्याबद्दल आपण ऐकत होतो, ती आता संपली आहे आणि ही गॅरंटी संपुष्टात आणण्याची ताकद तुमच्याकडे आहे, असे शरद पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती राज्य विधानसभा निवडणुकीतही दिसेल. त्यानंतर मी राज्याची सूत्रे तुमच्या हातात देईन. राज्यातील सत्ता जनतेच्या हातात येईल आणि या शक्तीचा उपयोग गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी केला जाईल आणि त्यासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे, असे पवार म्हणाले.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २४० जागा जिंकल्या आणि बहुमताच्या २७२ च्या आकड्यापेक्षा खूप मागे राहिले. सत्ता स्थापनेसाठी त्यांनी मित्रपक्षांच्या पाठिंब्याची गरज होती. चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड यांच्या पाठिब्यांची गरज पडली. त्यांनी आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये अनुक्रमे १६ आणि १२ जागा जिंकल्या आहेत.

दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या इंडिया आघाडीला २३३ जागा मिळाल्या, त्यापैकी ९९ जागा काँग्रेसला मिळाल्या. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील) आणि राष्ट्रवादी (अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील) यांच्या महायुतीला लोकसभेच्या १७ जागा मिळाल्या, तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या महाविकास आघाडीला एकूण ४८ जागांपैकी ३० जागा मिळाल्या. एका अपक्षानेही महाआघाडीला पाठिंबा दिला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर