Sharad Pawar: "माझं वय झालं म्हणता पण..."; शरद पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल
Sharad Pawar in Beed :सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचं आहे तर जा,पण निदान कोणामुळं आयुष्यात काही मिळालं असेल त्यांच्यामुळं भलं झालेलं असेल तर त्यांच्याप्रती थोडी माणुसकी जरी ठेवायचा प्रयत्न करा, असा टोला शरद पवारांनी फुटीर नेत्यांना लगावला आहे.
बीड– अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर शरद पवार यांनी राज्यव्यापी स्वाभिमान सभांचा धडाका लावला आहे. आज त्यांची बीडमध्ये सभा पार पडली. यावेळी शरद पवारांनी आपल्या वयावरुन भूमिका घेणाऱ्या अजित पवार गटातीलअमरसिंह पंडित यांच्यावर हल्लाबोल केला. ज्यांच्यामुळं तुमचं भलं झालं त्यांची थोडी तरी जाणीव ठेवा, अशा शब्दांत पवारांनी सोडून गेलेल्यांना सुनावलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
बीडमध्ये दुपारी पार पडलेल्या सभेत शरद पवार म्हणाले, या जिल्ह्याच्या नेत्यांना काय झालंय माहिती नाही. एका नेत्यांन सांगितलं कोणीतरी आमचा सहकारी पक्ष सोडून गेला. आम्ही चौकशी केली की काय झालं? आजपर्यंत सर्वकाही ठीक होतं. पण असं कळलं की त्यांना अमरसिंह पंडितांनी काहीतरी सांगितलं. त्यांनी काय सांगितलं तर पवार साहेबांचं आता वय झालंय, त्यामुळं आपल्याला भविष्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. पण माझं त्यांना एवढचं सांगण आहे माझं वय झालंय असं तुम्ही म्हणता पण तुम्ही माझं काम बघितलं आहे"
सामुदायिक शक्तीपुढे काय हेतं हे तुम्हाला माहिती आहे. एकदा या जिल्ह्याच्या जनतेच्या पाठिंब्यावर आम्ही लोकांनी हे केलं होतं. अनेकांचे पराभव तरुण पिढीच्या मदतीनं एकेकाळी इथच झाले होते.
माझं सांगण इतकंच आहे की ठीक आहे, सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचं आहे तर जा, पण निदान कोणामुळं आयुष्यात काही मिळालं असेल त्यांच्यामुळं भलं झालेलं असेल तर त्यांच्याप्रती थोडी माणुसकी जरी ठेवायचा प्रयत्न करा आणि असं नाही केलं तर लोक तुम्हाला योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दांत पवारांनी अजित पवारांसह त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांना सुनावलं आहे.