राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांकडून जवळपास ९० टक्के जागावाटप पूर्ण झाले आहे. राज्यातील चर्चित मतदारसंघापैकी एक असलेल्या अनुशक्तीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा पती फहद अहमद याला तिकीट जाहीर करण्यात आले आहे. समाजवादी पक्षाचे नेतेअसलेल्याफहाद अहमद यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला व त्यांनापक्षाने उमेदवारी जाहीर केली.
मात्र फहाद अहमदच्या उमेदवारीमुळे अणुशक्ती मतदारसंघातील राष्ट्रवादीतील इच्छुक नाराज झाले आहेत. अनेक कार्यकर्त्यांना हा निर्णय आवडला नाही. याबाबत आम्ही कार्यकर्त्यांनी चर्चा करून पुढील भूमिका जाहीर करू, असे वक्तव्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे मुंबई कार्याध्यक्ष आणि प्रवक्ते निलेश भोसले यांनीकेलं आहे. भोसले अनुशक्तीनगरमधून आमदारकीसाठी इच्छुक होते.
माध्यमांशी बोलताना निलेश भोसले म्हणाले की, अजित पवारांसोबत ३०-४० आमदार गेले. मंत्री गेले तरीही आम्ही डगमगलो नाही.पक्षाच्या अडचणीच्या काळात आमच्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते शरद पवारांचे विचार टिकवण्यासाठी निष्ठेने काम करत राहिलो. ज्यावेळी पक्षाला चांगले दिवस येतील तेव्हा आमच्यासारख्या निष्ठावंतांचा पक्ष नक्कीच विचार करेल, अशी अपेक्षा होती.मात्र बाहेरून आलेल्या नेत्याला पक्षाने तिकीट दिले. हा निर्णय दुर्दैवी असून अणुशक्ती नगरमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना न पटणारा आहे.
अनुशक्तीनगरमधून २ ते ३ इच्छुकांनी अर्ज केला होता. परंतु कदाचित आमच्यापैकी कुणाची बायको हिरोईन नसल्याने आम्हाला तिकिट मिळालं नसावं, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. अणुशक्तीनगरमध्ये ज्या भाडोत्रीने काही महिन्याआधी घर घेतलं, ज्याला या परिसरातील कुठलेही प्रश्न माहिती नाहीत. त्याला तिकीट दिले आहे. महायुतीचा उमेदवार जिंकू नये यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही कार्यकर्ते पक्षाचा कणा आहे. जोपर्यंत कार्यकर्त्यांशी आम्ही बोलत नाही, तोपर्यंत कोणताही निर्णय घेणार नाही. राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान जपला जाईल. आपल्या भूमिकेने नवाब मलिकांना फायदा होत असला तरी कार्यकर्त्यांच्या भावनांचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे. असं निलेश भोसले म्हणाले.
दरम्यान, ४ महिन्याआधी अणुशक्तीनगरमध्ये ज्या भाडोत्रीने घर घेतले, त्याला या परिसरातील कुठलेही प्रश्न माहिती नाहीत. ज्याप्रकारे १०-१५ वर्ष पूर्वीचे आमदार काम करत होते, त्यात जो फटका बसू शकतो. महायुतीचा उमेदवार जिंकू नये यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांशी बोलून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असं सांगत निलेश भोसले यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवारावर नाराजी व्यक्त केली.
संबंधित बातम्या