"आत्राम साहेब मुलीला नदीत फेकेन म्हणता, मग अजित पवारांना..."; शरद पवार गटातील नेत्याचा बोचरा बाण-ncp sharad pawar group leader criticized ajit pawar and dharamrao baba atram ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  "आत्राम साहेब मुलीला नदीत फेकेन म्हणता, मग अजित पवारांना..."; शरद पवार गटातील नेत्याचा बोचरा बाण

"आत्राम साहेब मुलीला नदीत फेकेन म्हणता, मग अजित पवारांना..."; शरद पवार गटातील नेत्याचा बोचरा बाण

Sep 12, 2024 07:54 PM IST

Dharamrao Baba Atram : मुलीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. तर तुम्हाला आता त्यांना नदीत फेकावे वाटले, मात्र तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना त्यांच्या काकांनी त्यांना अनेक पदे देऊनही त्यांनी त्यांच्या पाठीत सूरा खुपसला, त्यांना कोठे फेकायचे ते पण सांगा, असा टोला मेहबूब शेख यांनी लगावला आहे.

शरद पवार गटातील नेत्याची अजित पवारांवर घणाघाती टीका
शरद पवार गटातील नेत्याची अजित पवारांवर घणाघाती टीका

अजित पवार गटातील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीने आज शरद पवार गटात प्रवेश केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. आत्राम यांची मुलगी भाग्यश्री हलगेकर यांनी आज'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षात जाहीर प्रवेश केला. भाग्यश्री अहेरी मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे येथे बाप-लेकीमध्ये सामना रंगण्याची चिन्हे आहेत. शरद पवारांची साथ सोडणे आणि आता मुलगीच समोर उभी ठाकल्याने मंत्री बाबा आत्राम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गडचिरोली येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आत्राम तसेच अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.

मेहबूब शेख म्हणाले , गेल्या आठवड्यात येथे एक यात्रा झाली. त्या यात्रेचे नाव जनसन्मान यात्रा होते मात्र त्याचे नाव जनअपमान यात्राच असायला पाहिजे होतं, कारण जनतेसोबत गद्दारी करुन जी यात्रा निघते ती यात्रा जनसन्मान यात्रा नसते, असा जहरी टोला शेख यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला लगावला.

धर्मराव बाबा आत्राम यांनी त्या यात्रेत म्हटले की, माझ्या मुलीला नदीत फेकून देईन, ती मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होईल?असा सवाल त्यांनी करत आपला राग व्यक्त केला होता.यावर मेहबूब शेख म्हणाले, मुलगी सोडून जात असल्याचा त्यांना इतका राग अनावर झाला की, त्यांनी मुलाला नदीत फेकण्याची धमकी दिली. आत्राम साहेब तुमची मुलगी आहे, राग येणा साहजिक आहे. पण तुम्ही भाग्यश्री ताईला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. तर तुम्हाला आता त्यांना नदीत फेकावे वाटले, इतका राग आला. पण, त्यावेळी तुमच्या स्टेजवर जे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार बसले होते. त्या अजित पवारांना त्यांच्या चुलत्यांनी वडिलांप्रमाणे सांभाळले. त्यांना तीनवेळा राज्याचे उपमुख्यमंत्री केले, विरोधी पक्षनेता केले, अनेक वेळा आमदार केले, राज्यमंत्री केले १८ वर्षे अनेक पदे देऊन सोन्याचा चमचा तोंडात दिला. त्या अजितदादांनी स्वत:च्या काकाच्या पाठीत सूरा खूपसला, त्यांना कुठे फेकायचे हे पण सांगून टाका', अशी घणाघाती टीका मेहबूब शेख यांनी अजित पवार यांच्यावर केली.

कांकाचाही एक डाव शिल्लक-

अजित पवारांनी त्यावेळी आपल्या भाषणात म्हटले होते की, ज्या बापाने जन्म दिला, जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं. तीच मुलगी आता बापाविरोधात गेली आहे. मात्र त्यांना एकच सांगणं आहे की,जेव्हा वस्ताद शिकवतो त्यावेळी तो सगळं शिकवत नाही. तो कायम एक डाव राखून ठेवतो. अजूनही चूक भूल करू नका, बापासोबत राहा, बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते. यावर शेख म्हणाले की,  मग दादा तुम्ही देखील काकांचे झाले नाहीत, मग लोकांचे काय होणार. अजितदादा म्हणाले वस्ताद एक डाव शिल्लक ठेवत असतो. तसे तुम्हाला अजून काकांचा एक डाव शिल्लक आहे, असा टोलाही अजित पवारांना लगावला.

Whats_app_banner