निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत मोठा निकाल देत अजित पवार गटाला झुकते माप दिले आहे. हा निकाल म्हणजे शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांना बहाल केले आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक होत असताना ज्यांनी पक्ष स्थापन केला ते पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत कुठे? निवडणूक आयोगाच्या निकालावर त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर शरद पवार कुठे आहेत, याची माहितीही दिली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातल्या ज्या राज्यसभा खासदारांची टर्म संपत आहे, त्या खासदारांसाठी शरद पवारांनी एक फेअरवेल ठेवले आहे. ते सर्व खासदार शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी उपस्थित आहेत. यामुळे शरद पवार बाहेर येऊ शकत नाहीत, असे सुळे यांनी सांगितले. या फेअरवेलला वंदना चव्हाण, प्रकाश जावडेकर यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक खासदार उपस्थित असल्याचे सांगितले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमदारांच्या संख्येवरून निकाल दिल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या संख्येवरून पक्ष कोणाचा हे ठरविता येणार नाही, असा एक निकाल दिलेला आहे. यामुळे आयोगाच्या या निकालाविरोधात आम्ही सर्वोच्च न्य़ायालयात जाणार असल्याचे सुळे म्हणाल्या.
सुरुवातीपासून हा पक्ष शरद पवारांचा आहे आणि त्यांनीच हा उभा केला आहे. त्यामुळे तुम्ही ज्यांनी घर बांधलं त्याच वडिलांनाच घराबाहेर काढलं आहे. शून्यातून सुरु केलेला हा पक्ष त्यांच्याकडून काढून घेतला आहे.