मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Bhojan Thali: शिवभोजन थाळी बंद होऊ देणार नाही; राष्ट्रवादी आक्रमक

Shiv Bhojan Thali: शिवभोजन थाळी बंद होऊ देणार नाही; राष्ट्रवादी आक्रमक

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 27, 2022 02:06 PM IST

Shiv Bhojan Thali: शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा विचार शिंदे-फडणवीस सरकार करत असून त्यास राष्ट्रवादी काँग्रसेनं तीव्र विरोध दर्शवला आहे.

Shiv Bhojan Thali
Shiv Bhojan Thali

Shiv Bhojan Thali: राज्यातील गरीब नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून महाविकास आघाडी सरकारनं सुरू केलेली शिवभोजन थाळी योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळं या योजनेचा फेरआढावा घेतला जात असून या अंतर्गत थाळ्यांच्या संख्येत वाढ करण्यास स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळं ही योजना बंद केली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारच्या या संभाव्य निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. 'करोनाच्या काळात जेव्हा उपहारगृह बंद होती, लोकांचा रोजगार बंद होता, रोजंदारी बंद होती त्याकाळात महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला पोटाची भूक भागवता यावी या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीने शिवभोजन थाळी उपक्रम राज्यभर राबवला होता. हातावर पोट असलेल्या अनेकांनी याचा लाभ घेतला. त्यामुळं गरिबांची ही शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कडाडून विरोध करेल, असं तपासे यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवभोजन थाळीच्या माध्यमातून लाखो गरीब व सर्वसामान्य लोकांना अतिशय अल्पदरात स्वादिष्ट व पौष्टिक थाळी देण्यात आली होती. घरकामगार, फेरीवाले, रिक्षावाले अशा लाखो लोकांसाठीच शिवभोजन थाळीची संकल्पना महाविकास आघाडीनं मांडली होती, असं महेश तपासे यांनी सांगितलं.

'महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेले ईडी सरकार ठाकरे सरकारच्या सर्व योजनांचा फेरआढावा घेत सर्वसामान्यांची शिवभोजन थाळी बंद करण्याच्या किंवा त्याच्यात कपात करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. शिंदे सरकारनं शिवभोजन थाळी बंद केल्यास किंवा कुठलीही कपात केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा तपासे यांनी दिला.

IPL_Entry_Point

विभाग