मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Border dispute : “हवेत गोळीबार करणारे भाजप नेते आता कुठं गेले? यापुढं महाराष्ट्र शांत बसणार नाही"

Border dispute : “हवेत गोळीबार करणारे भाजप नेते आता कुठं गेले? यापुढं महाराष्ट्र शांत बसणार नाही"

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 06, 2022 07:57 PM IST

Maharashtra-Karnataka Border Dispute : कर्नाटककडून महाराष्ट्रातील बसेस व ट्रकांवर दगडफेक करण्यात आली आहे. यावरून रोहित पवारांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, हवेत गोळीबार करणारे भाजप नेते आता कुठे आहेत.

रोहित पवार
रोहित पवार

Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला असून कर्नाटकातील बेळगावात महाराष्ट्रातील ट्रकांवर तसेच बसेसवर दगडफेकीच्या घटना आहेत. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिरे बागेवाडी टोल नाक्यावर दगडफेक करत महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात येत असून शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटककडून हिंसाचार न थांबल्यास आपण स्वत: कर्नाटकात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता रोहित पवार यांनीही सत्ताधारी भाजपवर निशणा साधला आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करून कर्नाटक हिंसाचारावर भाष्य केले आहे.' कन्नड रक्षण वेदिके'चे कार्यकर्ते महाराष्ट्राचे ट्रक फोडून धुडगूस घालत असताना, हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजपचे नेते कुठे आहेत? निवडणूक डोळ्यापुढे ठेवून कर्नाटकातील भाजप सरकार आक्रमक होतेय, तर महाराष्ट्रातील भाजपप्रणित सरकार मात्र आपली अस्मिता विसरुन मिळमिळीत भूमिका घेतेय. संवादातून मार्ग काढता येतो, पण वाहनांवर दगड मारणे हा कसला संवाद? राज्य सरकारच्या मिळमिळीत भूमिकेमुळे महाराष्ट्र झुकला, असा अर्थ कर्नाटकाकडून काढला जातोय. पण राज्यावर आणि राज्याच्या अस्मितेवर असेच हल्ले होत राहिले, तर कधीही कुणापुढे न झुकणारा महाराष्ट्र यापुढे शांत बसणार नाही, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

शरद पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सीमावाद उफाळून आला आहे आणि यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत. सीमावादावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे आणि स्थिती गंभीर झाली आहे. येत्या २४ तासांत हल्ले थांबले नाहीत तर आमचाही संयम सुटेल, असा रोखठोक इशारा शरद पवारांनी दिलाआहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या