Jitendra Awhad on Coaching Classes Guidelines : कोचिंग क्लाससाठी केंद्र सरकारनं नवी नियमावली जाहीर केली असून १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांच्या खासगी शिकवण्यांवर बंदी घातली आहे. केंद्राच्या या निर्णयास शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोध केला आहे. ही तर हुकूमशाही आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
१६ वर्षांच्या खालील मुलांची खासगी शिकवणी घेतल्यास एक लाखाचा दंड आकारला जाईल. तसंच, कोचिंग सेंटरची नोंदणी रद्द केली जाईल, असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोचिंग सेंटरमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या घटना समोर आल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मात्र हा निर्णय अन्यायी असल्याचं म्हटलं आहे. आव्हाड यांनी या संदर्भात 'एक्स' अकाऊंटवर सविस्तर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी सध्याच्या काळात खासगी शिकवण्याची गरज अधोरेखित केली आहे.
'दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये पाठवून त्यांचा जादा अभ्यास करून घेण्याची पालक-शिक्षकांची मानसिकता असते. कोचिंग क्लासेस हे नोकरदार आई-वडिलांना साह्यभूत ठरत आलेले आहेत. सारासार विचार करता, कोचिंग क्लासेसमुळं विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रचंड सुधारणा होते. असं असताना १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस नाहीत, ही तर हुकूमशाही आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
'ज्यांना कोचिंग क्लासेसला जायचं असेल त्यांना जाऊ द्यावं, त्यांना थांबवता कशाला? या निर्णयानं किती शिक्षकांवर गदा येणार आहे, याचा अंदाजच न केलेला बरा! मध्यंतरी घरगुती ट्यूशन्स बंद केल्या होत्या. भविष्यात आता घरातच राहा, असं म्हणण्यापर्यंत यांची मजल जाईल, अशी भीतीही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या