Jitendra Awhad on comment on Lord Ram : प्रभू रामचंद्र हे स्वत: मांसाहारी होते. ते शिकार करून खायचे, असं वक्तव्य केल्यामुळं वादात सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, ‘मी जे बोललो ते माझ्या मनातलं नव्हतं. वाल्मिकी रामायणात तसं लिहिलं आहे. ज्यांना हवं त्यांनी वाचावं,’ असा सल्लाही त्यांनी यावेळी त्यांच्या टीकाकारांना दिला.
अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी राम मंदिराचा उद्घाटन सोहळा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभर निरनिराळे उपक्रम सुरू आहेत. उद्घाटनाच्या दिवशी मांसविक्रीवर बंदी घालावी अशी मागणी भाजपच्या एका आमदारानं केली होती. त्यावर बोलताना आव्हाड यांनी प्रभू राम मांसाहारी होते असं म्हटलं होतं. त्यावरून गदारोळ झाला होता. त्यांच्यावर जोरदार टीका झाली तसंच काही ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आले.
या सगळ्या वादाला पूर्णविराम देण्यासाठी आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला. ‘अनेक लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. केवळ त्या लोकभावना लक्षात घेऊन मी खेद व्यक्त करतोय. मात्र मी कधीच निराधार बोलत नाही, ती माझी सवय नाही. मी अभ्यास करून बोलतो. मी जे बोललो ते वाल्मिकी रामायण या ग्रंथातील अयोध्या कांडात नमूद केलं आहे. ज्यांना हवं त्यांनी वाचावं,’ असं आवाहन आव्हाड यांनी केलं.
'येत्या २२ जानेवारीपर्यंत भावनांवरच सगळं चालणार आहे. लॉजिकवर कोणी बोलणारच नाही. त्यामुळंच मी दिलगिरी व्यक्त करतोय, असं आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी भाजपचे आमदार राम कदम यांना बोचरा टोला हाणला. 'मी प्रभू रामाबद्दल वक्तव्य केल्यानंतर अनेकांना वाईट वाटलं. अगदी मुली पळवून आणण्याची भाषा करणारेही माझ्यावर तुटून पडले. त्यांचंही नाव रामच आहे, असा सणसणीत टोला आव्हाड यांनी हाणला.
आव्हाड यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबद्दल विचारलं असता, 'माझ्यावर अमेरिकेतही गुन्हे दाखल केले तरी फरक पडत नाही. गुन्ह्यांना घाबरणारा मी माणूस नाही. मी शब्दाचा पक्का माणूस आहे. विनाकारण कुठलीही गोष्ट बोलत नाही, असंही आव्हाड यांनी विरोधकांना सुनावलं.
संबंधित बातम्या