मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार; दाऊद टोळीशी संबंध असल्याचं कोर्टाचं निरीक्षण

नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार; दाऊद टोळीशी संबंध असल्याचं कोर्टाचं निरीक्षण

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
May 21, 2022 09:31 AM IST

डी गँगशी संबंध ठेवूनच मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मंत्री नवाब मलिक
मंत्री नवाब मलिक (फोटो - पीटीआय)

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे सध्या अटकेत असून त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचे डी गँगशी संबंध असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं असल्याची माहिती समोर येत आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. गोवावाला कंपाउंडसाठी मलिक यांनी कट रचल्याचं ईडीने म्हटलं आहे. तसंच नवाब मलिक आणि हसीना पारकर यांच्यात अनेक बैठका झाल्याचं आणि मनी लाँड्रिंग केल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

ईडीने नवाब मलिक यांच्यावर आरोप करताना त्यांनी हसीना पारकार, सरदार शाहवली खान यांच्यासोबत बैठका घेतल्याच म्हटलं आहे. तसंच मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खान याच्या संपर्कात होते. डी गँगशी संबंध ठेवूनच मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आरोपपत्रात काय?


मलिक यांचा दाऊदच्या लोकांशी संबंध असल्या सकृतदर्शनी पुरावा असल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे. गोवावाला कंपाऊंडच्या जागेसंदर्भात मलिक यांनी डी गँगशी संबंधित लोकांसोबत बैठकाही घेतल्या. ही जागा मिळवण्यासाठी मलिक यांनी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोपही कऱण्यात आला आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचे पुरावे आढळल्याचा दावा ईडीने केला असून गोवावाला कंपाउंड हे मुनिरा प्लंबर आणि तिच्या कुटुंबियांच्या मालकीचं असल्याचं म्हटलं आहे. हसीना पारकरने फसवणूक करून मलिक यांच्यासाठी या मालमत्तेचे हक्क मिळवल्याचं ईडीने आरोपपत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागमी होत आहे. नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध असल्याचं भाजप नेते सातत्यानं आरोप करत आलेत. तर भाजपच्या सांगण्यावरून ही कारवाई सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्री नवाब मलिक हेसुद्धा तुरुंगात गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला भाजपकडून घेरण्याचा प्रयत्न केला जातोय.

IPL_Entry_Point

विभाग