मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Awhad : शिवरायांबरोबरही हे लोक असेच वागले होते; काळाराम मंदिरातील घटनेवर राष्ट्रवादीचा नेता संतापला
Kala Ram Mandir
Kala Ram Mandir

Awhad : शिवरायांबरोबरही हे लोक असेच वागले होते; काळाराम मंदिरातील घटनेवर राष्ट्रवादीचा नेता संतापला

31 March 2023, 13:23 ISTGanesh Pandurang Kadam

Jitendra Awhad on Kala Ram Mandir Incident : संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगीताराजे भोसले यांना काळाराम मंदिरातील मंहंतांनी वेदोक्त मंत्रोच्चारास विरोध केल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

Jitendra Awhad on Sanyogeetaraje Post : नाशिक येथील काळाराम मंदिरात छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगीताराजे यांना वेदोक्त मंत्रोच्चारापासून रोखण्यात आल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरवर खरमरीत पोस्ट लिहून या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. 'शिवरायांबरोबरही सनातनी मनुवादी असेच वागले, ते आजही छत्रपतींना शुद्रच मानतात, असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

संयोगीताराजे दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. तिथं त्यांनी पूजा केली व महामृत्युंजय मंत्राचा जप केला. त्यावेळी तुम्हाला वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही, असं तिथल्या महंतांनी सांगितलं. संयोगीताराजे यांनी त्यास विरोध करत महामृत्युंजय मंत्र म्हटलाच, शिवाय रामरक्षेचंही पठण केलं. मात्र, या प्रकाराबद्दल सामाजिक व राजकीय वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी सविस्तर पोस्ट लिहून यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 'छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्याना सुनावलं, छत्रपतींमुळे मंदिर राहिली त्यांनाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही? त्यावर तुम्हाला अधिकार नाही, असं उत्तर महंतांनी दिलं.

महंतांच्या या भूमिकेवर आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. 'छत्रपतीं शिवाजी महाराजां बरोबर देखील सनातनी मनुवादी असेच वागले. छत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली. शाहू महाराजांना हेच सनातनी मनुवादी शुद्र म्हणाले होते. आजही ते छत्रपतींना शुद्र समजतात, असा आरोप आव्हाड यांनी केला.

बहुजनांनो डोळे उघडा!

'छत्रपतींच्या वारसांसोबत हा प्रकार घडला ते एका अर्थानं बरंच झालं. याच सनातनी धर्माबद्दल मी बोलत होतो. आजही ते वर्णव्यवस्था असल्याचं दाखवून देतात. आणखी कुठला पुरावा हवा? छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांच काय? बहुजनांनो डोळे उघडा, हाच तो सनातन धर्म, तो तुम्हाला शुद्रच मानतो, असं आव्हाड यांनी शेवटी म्हटलं आहे.