मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर; कोठडी सुनावल्यानंतर काही वेळातच सुटका

जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर; कोठडी सुनावल्यानंतर काही वेळातच सुटका

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Nov 12, 2022 04:30 PM IST

Jitendra Awhad gets bail: सिनेमागृहात प्रेक्षकांना झालेल्या मारहाण प्रकरणात काल अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळाला आहे.

Jitendra Awhad
Jitendra Awhad

Jitendra Awhad gets bail: सिनेमागृहात प्रेक्षकांना झालेल्या मारहाण प्रकरणात शुक्रवारी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळाला आहे. उच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला आहे. इतर ११ जणांनाही न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.

विवियाना मॉलमधील सिनेमागृहात सुरू असेलल्या 'हर हर महादेव' या वादग्रस्त चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी व तिथं प्रेक्षकांना झालेल्या मारहाण प्रकरणी आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथं न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर आव्हाड यांनी तात्काळ उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी झाली. आव्हाड यांच्यावर लावण्यात आलेली कलमं चुकीची आहेत. यापैकी एक कलम ठाणे जिल्ह्याला लागूच होत नसल्याचंही आव्हाड यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. सुनावणीअंती न्यायालयानं आव्हाड यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'हर हर महादेव' या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं चुकीचं चित्रण केल्याचा राज्यातील अनेक पुरोगामी संघटनांचा आरोप आहे. जितेंद्र आव्हाड यांचाही तोच आक्षेप होता. त्यामुळं हा चित्रपट कुठंही दाखवला जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. हेच सांगण्यासाठी आव्हाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात गेले होते. तिथं त्यांनी चित्रपटाचा शो बंद पाडला. त्यावेळी काही प्रेक्षकांनी पैसे परत मागितल्यानं आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली होती. या प्रकरणी आव्हाड यांच्यासह अन्य ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

WhatsApp channel