मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jayant Patil: शरद पवारांना इन्कम टॅक्सची नोटीस; जयंत पाटील म्हणाले…

Jayant Patil: शरद पवारांना इन्कम टॅक्सची नोटीस; जयंत पाटील म्हणाले…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jul 02, 2022 06:48 PM IST

Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आलेल्या इन्कम टॅक्स नोटिशीवर जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Jayant Patil - Sharad Pawar
Jayant Patil - Sharad Pawar

Jayant Patil on Income Tax notice to Sharad Pawar: नव्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी सोहळा एकीकडं पार पडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईतील पक्ष कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. 'इन्कम टॅक्सनं मला एक प्रेमपत्र आलं आहे. २००४ साली लोकसभा निवडणूक लढवत असताना प्रतिज्ञापत्रात जी माहिती भरली होती त्याची चौकशी आता करत आहेत. २००९ साली देखील मी लोकसभेला उभा होतो, २००९ नंतर २०१४ च्या राज्यसभा निवडणुकीला उभा राहिलो. त्यानंतरच्या २०२० च्या राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्राबद्दलची नोटीसही आता आलेली आहे. सुदैवानं त्याची सर्व माहिती माझ्याकडं व्यवस्थित ठेवलेली आहे, असं ट्वीट शरद पवार यांनी काल केलं होतं.

जयंत पाटील यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले, 'पवार साहेबांना आयकर विभागाची नोटीस आल्याचं आम्हाला देखील कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेनंतरच कळलं. मागच्या चार निवडणुकीत पवारसाहेबांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्राची माहिती मागविण्यात आली आहे. पवारसाहेबांना नोटीस पाठविण्याऐवजी आयकर विभागानं निवडणूक आयोगाकडून ही माहिती घेतली असती तर त्यांना तिथून माहिती मिळाली असती. परंतु जाणीवपूर्वक यंत्रणांचा गैरवापर करून प्रभाव निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

संजय राऊत यांच्याबाबत टोकाची भूमिका घेतली जाणार नाही असं वाटतं!

'संजय राऊत यांना ईडीची नोटीस आली असून ते चौकशीला सामोरे गेलेले आहेत. ते निर्दोष असून त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. आजच्या चौकशीच्या शेवटी ईडीचे दिल्लीतील अधिकारी काय निर्णय देतात हे पाहावं लागेल. कारण याआधी आमचे नेते सुद्धा दिवसा चौकशीला गेल्यानंतर त्यांची रात्रीपर्यंत चौकशी चालली आणि रात्री उशिरा त्यांच्या अटकेच्या बातम्या आल्या. संजय राऊत यांच्याविरोधात ईडी जाणीवपूर्वक टोकाची भूमिका घेणार नाही, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

WhatsApp channel

संबंधित बातम्या