मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्याला एकनाथ खडसेंचा पाठिंबा, म्हणाले...

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्याला एकनाथ खडसेंचा पाठिंबा, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 28, 2022 10:05 AM IST

Pankaja Munde : ‘मी जर पक्षाशी प्रामाणिक असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही मला हरवू शकत नसल्याचं’ वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यानंतर आता खडसेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Pankaja Munde On PM Narendra Modi
Pankaja Munde On PM Narendra Modi (HT)

Pankaja Munde On PM Narendra Modi : काल एका कार्यक्रमात बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. पक्षाशी एकनिष्ठ राहिले तर मला मोदीही हरवू शकत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळं भाजपमध्ये खळबळ उडाली असून आता त्यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पाठिंबा दिला आहे.

पंकजा मुंडेंच्या या वक्तव्याविषयी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव कोणत्या अर्थानं घेतलं, याबाबत मला माहिती नाही. अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम केल्यानंतर कुणीही पराभूत करू शकणार नाही, अशी त्यांची भावना असू शकते. परंतु त्यांनी जर मोदींचं नाव घेतलं असेल तर ते दुर्दैवी असल्याचं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं आहे. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून त्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर नाराजी व्यक्त करत आहेत. तरीसुद्धा त्या त्यांचं काम प्रामाणिकपणेच करतायंत, असं म्हणत खडसेंनी थेट पंकजा मुंडेंची पाठराखण केल्यानं आता राजकीय चर्चांना उधान आलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

बीडमध्ये एका नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, राजकारणात मलाही घराणेशाहीचा वारसा आहे. पण मी कुणाच्या वारशाच्या मदतीनं राजकारण करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना घराणेशाहीचं राजकारण संपवायचं आहे. परंतु मी ही घराणेशाहीचं प्रतिक आहे. मी लोकांच्या मनावर राज्य केलेलं असल्यानं मला स्वत: पंतप्रधान मोदीही हरवू शकत नसल्याचं वक्तव्य मुंडे यांनी केलं होतं.

दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये वितुष्ठ आल्याची चर्चा आहे. २०१९ साली परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता. त्यानंतर भाजपनं त्यांना विधानपरिषदेवर उमेदवारी दिली नव्हती. याशिवाय पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमात त्यांना सहभागी केलं जात नसल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. त्यामुळं आता मुंडे आणि भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचं बोललं जात आहे.

WhatsApp channel