अजित पवारांच्या पक्षात राडा! मंत्रिमंडळातून वगळलेल्या छगन भुजबळ यांचे पक्ष सोडण्याचे संकेत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अजित पवारांच्या पक्षात राडा! मंत्रिमंडळातून वगळलेल्या छगन भुजबळ यांचे पक्ष सोडण्याचे संकेत

अजित पवारांच्या पक्षात राडा! मंत्रिमंडळातून वगळलेल्या छगन भुजबळ यांचे पक्ष सोडण्याचे संकेत

Dec 16, 2024 04:12 PM IST

Chhagan Bhujbal News : राज्य मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज झाले असून त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत.

अजित पवारांच्या पक्षात राडा! मंत्रिमंडळातून वगळलेल्या छगन भुजबळ यांचा पक्षाला निर्वाणीचा इशारा
अजित पवारांच्या पक्षात राडा! मंत्रिमंडळातून वगळलेल्या छगन भुजबळ यांचा पक्षाला निर्वाणीचा इशारा (ANI)

Maharashtra Cabinet News : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळं ज्येष्ठ नेते छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. पक्षानं दिलेली राज्यसभेची ऑफर स्पष्ट शब्दांत नाकारतानाच त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेतही दिले आहे. ‘जहाँ नही चैना, वहा नही रहना…’ असं सूचक विधान त्यांनी केलं आहे. 

नागपूरमध्ये आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या विस्तारात अजित पवारांच्या पक्षानं छगन भुजबळ व दिलीप वळसे-पाटील यांना स्थान दिलं नाही. हा खरंतर सर्वांसाठीच धक्का होता. वळसे-पाटील यांची यावरची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही. मात्र, छगन भुजबळ यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलनं यावर भाष्य केलं आहे. ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते.

जरांगे यांच्या विरोधात लढल्याचं बक्षीस

मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू असताना छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाची बाजू लावून धरली होती. त्याचंच हे बक्षीस आहे का असं पत्रकारांनी विचारलं असताना भुजबळ यांनी होकारार्थी उत्तर दिलं. मला डावललं जाईल हे मला अपेक्षित नव्हतं. महायुती सरकार येण्यामध्ये लाडकी बहीण आणि ओबीसी समाजाचा मोठा वाटा होता. सभागृहात दोन्ही बाजूंचे सदस्य अंगावर येत असतानाही ओबीसींची बाजू मी कायदेशीरपणे मांडली होती. थेट लढ्यात उतरलो होतो. जरांगे पाटील यांना अंगावर घेतलं होतं. या सगळ्याचा महायुतीला फायदा झाला असं निवडून आलेले आमदारही मान्य करतात, असं भुजबळ म्हणाले.

राज्यसभेची ऑफर नाकारली!

'पक्षाच्या नेत्यांनी मला राज्यसभेची ऑफर दिली होती. पण ती घ्यायची तर मला राजीनामा द्यावा लागेल. मी आताच निवडून आलो आहे. त्यामुळं लगेच राजीनामा देणं ही माझ्या मतदारांशी प्रतारणा ठरेल, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

छगन भुजबळ कधी संपला नाही!

'मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय आणि फेकलं काय? काय फरक पडतो? अशी मंत्रिपदं किती वेळा आली आणि किती वेळा गेली. छगन भुजबळ संपला नाही, असं भुजबळ म्हणाले.

'मला का डावललं हे डावलणाऱ्यांना विचारा असं ते म्हणाले. अजित पवार यांच्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही, असंही भुजबळ यांनी सांगितलं. मी नाराज आहेच. मी मतदारसंघातील लोक, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधेन आणि पुढील भूमिका ठरवेन, असं ते म्हणाले.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर