मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhujbal vs Fadnavis: काळ्या-पांढऱ्या दाढीवरून भुजबळ आणि फडणवीसांमध्ये टोलेबाजी; सभागृहात हास्यकल्लोळ

Bhujbal vs Fadnavis: काळ्या-पांढऱ्या दाढीवरून भुजबळ आणि फडणवीसांमध्ये टोलेबाजी; सभागृहात हास्यकल्लोळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 18, 2022 03:29 PM IST

Maharashtra Assembly Session 2022 : 'राज्याला पहिल्यांदाच काळ्या दाढीचा मुख्यमंत्री मिळाल्याचं' छगन भुजबळांनी सांगताच 'आमच्याकडे पांढऱ्या दाढीवाल्यांचा फार सन्मान केला जातो' असं म्हणत फडणवीसांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

Bhujbal vs Fadnavis in Maharashtra Assembly Session 2022
Bhujbal vs Fadnavis in Maharashtra Assembly Session 2022 (HT)

maharashtra assembly monsoon session 2022 live : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे सरकारवर जोरदार प्रश्नांची सरबत्ती केल्यानं शिंदे सरकारमधील मंत्र्यांची उत्तर देताना भंबेरी उडाल्याचं पाहायला मिळालं. परंतु त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार राजकीय फटकेबाजीचा सामना पाहायला मिळाला.

काळ्या दाढीचा प्रभाव राज्यापुरताच, पांढऱ्या दाढीचा संपूर्ण हिदुस्थावर- भुजबळ

विधानसभेत सत्तापक्षाकडून सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र वस्तू व सेवाकर सुधारणा विधेयकावर बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ उभे राहिले, परंतु ते बोलत असताना म्हणाले की 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचं मला फार चांगलं वाटलं, मला जरा वेगळ्या पद्धतीनं एक गोष्ट सांगायची आहे की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राला लाभलेले पहिले दाढीवाले मुख्यमंत्री आहे, पण त्यांची दाढी काळी असल्यानं त्याचा प्रभाव राज्यापुरताच मर्यादित आहे, पण पांढऱ्या दाढीचा प्रभाव संपूर्ण हिंदुस्थानावर असल्याचं' त्यांनी सांगितलं.

आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा सन्मान केला जातो- उपमुख्यमंत्री

राष्ट्रवादीचे नेते भुजबळांनी केलेल्या टोलेबाजीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत 'आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा फार सन्मान केला जातो', असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांनी भुजबळांना भाजपमध्ये येण्याचं थेट आवाहन केल्यानं सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.

दरम्यान आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाचं २०२३ पर्यंत काम मार्गी लावण्याची घोषणा केली आहे. याशिवाय आज विधानसभेत महाराष्ट्र वस्तू व सेवाकर सुधारणा विधेयक मंजुर करण्यात आलं आलं आहे. त्यामुळंही विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या