Ajit Pawar Makar Sankranti Speech Video: भाजप पक्षातील नेते आणि त्यांच्या मित्र पक्षातील कार्यकर्ते नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंडभरून स्तुती करताना आपण पाहिले आहे. मात्र शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांनी मोदींबाबत वेगळेच मत व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यात अजित पवार मोदींना हटवण्याची भाषा करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे? याविषयी अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, २०१९ च्या निवडणुकांदरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे.
संपूर्ण देशभरात आज वर्षातील पहिला सण मकर संक्रांती मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात ते एका सभेमध्ये भाषण करत असल्याचे दिसत आहेत. या व्हिडिओत अजित पवार मोदींना आणि भाजपला हटवण्याची विनंती करत आहेत.
“मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण या मोदींना हटवा. भाजपाला बाजूला करा”, असे अजित पवार या व्हिडिओत बोलत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होत असताना नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोलिंग सुरू केले आहे. हा व्हिडीओही नेमका कधीचा आहे? याविषयी माहिती नसून तो २०१९ च्या निवडणुकांआधीचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, मकर संक्रातीच्या निमित्ताने विरोधी पक्षातील नेते अजित पवारांच्या या व्हायरल व्हिडिओनंतर त्यांना लक्ष्य करत आहेत.
महाराष्ट्राने गेल्या वर्षात सत्तांतराचे नाट्य पाहिले. सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचा हात सोडला आणि शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. एकेकाळी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जहरी टीका करणारे अजित पवारांचा जुना व्हिडिओ व्हायरल झाल्याने विरोधक त्यांच्यावर निशाणा साधत आहेत.