Rohit Pawar News: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि पक्षाचे आमदार रोहित पवार हे गुरुवारी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. गेल्या दहा दिवसांत ईडीकडून रोहित पवार यांची दुसऱ्यांदा चौकशी केली जात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी २४ जानेवारी रोजी त्यांची ११ तास चौकशी केली होती.
रोहित पवार हे त्यांची पत्नी कुंती आणि शरद पवार यांची नातू रेवती सुळे यांच्यासह दक्षिण मुंबईतील कार्यालयात पोहोचले. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार जवळच असलेल्या राष्ट्रवादी च्या कार्यालयात होत्या. रोहित २४ जानेवारीला ईडीसमोर हजर झाले, तेव्हा शरद पवारांनी जवळपास १२ तास पक्ष कार्यालयात त्यांच्या सुटकेची वाट पाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. रोहित पवार यांच्या समर्थनार्थ गेल्या आठवड्याप्रमाणे राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने पक्ष कार्यालयात उपस्थित आहेत.
रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील हायटेक इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, समृद्धी शुगर प्रायव्हेट लिमिटेड आणि बारामती अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड (बीएपीएल) या कंपन्यांशी संबंधित व्यक्तींच्या घरांवर ईडीने ५ जानेवारी रोजी राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद आणि बारामती सह शहरातील सुमारे सहा ठिकाणी छापे टाकले होते. २०१२ मध्ये औरंगाबादच्या साखर कारखान्याच्या कथित लिलावात घोटाळा आणि बीएपीएल आणि अन्य दोन कंपन्यांनी बँकेचा निधी वापरल्याच्या संशयावरून ईडीची चौकशी सुरू आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलावात सहभागी होण्यासाठी पाच कोटी रुपयांची अर्नेस्ट मनी डिपॉझिट सादर करण्याची अट पूर्ण करण्यासाठी बीएपीएलने आरोपी सहनिविदाकाराला निधी दिल्याचा आरोप आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे रोहित सध्या बीएपीएलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
ईडीच्या म्हणण्यानुसार, बीएपीएल, आता बंद पडलेल्या हायटेक इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि समृद्धी शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१२ मध्ये औरंगाबादस्थित सहकारी साखर कारखाना कन्नड एसएसकेच्या लिलावात भाग घेतला होता. अखेर लिलावात कन्नड एसएसके ला बीएपीएलने सुमारे ५० कोटी रुपयांना विकत घेतले. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २६ ऑगस्ट २०१९ रोजी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे हा तपास सुरू करण्यात आला.
ईडीच्या म्हणण्यानुसार, हायटेक इंजिनीअरिंगला बारामती अॅग्रोकडून पाच कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती, जी काही दिवसांनी कन्नड एसएसकेच्या लिलावात सहभागी होण्यासाठी ईएमडी म्हणून वापरली गेली. एमएससीबीकडून कर्ज घेतलेल्या कन्नड एसएसकेची बँकेने सरफेसी कायद्यांतर्गत लिलावाद्वारे विक्री केली.