अनिल देशमुख, राजेश टोपे अन् मी...; अमित शाहांना भेटल्याच्या चर्चेंवर जयंत पाटील स्पष्टच बोलले
Jayant Patil: पुण्यात अमित शाहांना भेटल्याच्या चर्चांवर राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Amit Shah Pune Visit: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात फुट पडल्यानंतर शरद पवार यांचे विश्वासू नेते जयंत पाटील यांनी काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेवर जयंत पाटलांनी पूर्णविराम लावले आहे. मी कालपासून मुंबईतच आहे. मात्र, मी पुण्याच्या गेल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत झळकत आहेत. मी आमित शाह यांची भेट घेतल्याची जे चर्चा करत आहेत, त्यांनाच जाऊन विचार. माझ्यासारख्या गरिबाला का विचारता? मी कालही इथेच होतो, आजही इथेच होतो आणि उद्याही इथेच असणार आहे, अशा शब्दात जयंत पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली.
ट्रेंडिंग न्यूज
अमित शाहांना भेटल्याच्या चर्चेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "मी कुठे आणि का गेलो? याचे पुरावे दिसले किंवा माहिती मिळाली, तर बातम्या करा. तुम्ही बातम्या तयार केल्यात, तर तुम्हीच त्या बंद करा. एखाद्याबद्दल महाराष्ट्रात गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरु झाला, तर हे बरोबर नाही. पण, सकाळपासून बातम्या पाहून माझी करमणूक होत आहे. अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारा मी आणि माझ्याबरोबरचा एक सहकारी रात्री दोनपर्यंत घरीच होतो. मग पुण्याला कधी गेलो? काल संध्याकाळी आणि आज सकाळी मी शरद पवारांच्या घरीच होतो. मग मी कधी अमित शाहांना भेटलो? याचे संशोधन करा".
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले. त्यांचा पुणे शहरात दुसरा कोणताही कार्यक्रम नाही. दोन दिवसांचा दौऱ्याच इतर सर्व वेळ राखीव ठेवला. अमित शाह दाखल झाल्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पुणे येथील जे डब्लू मेरीट हॉटेल अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेतली. रात्री अकरा वाजेपासून उशीरापर्यंत या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु झाली. त्यात राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार, भाजपचे मिशन ४५ आदी मुद्यांचा समावेश होता.