राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात केली होती. आता राज्यपालांबाबत भाजप हायकमांड निर्णय घेणार असून २६ जानेवारीची मानवंदना स्वीकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवले जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेचा, महापुरुषांचा अपमान केल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातच ही बाब होती की, राज्यपालांनी पायउतार झालं पाहिजे. आम्हाला राज्यपाल तोंडी सांगत होतेच की मुझे जाना हैं.. आता आज त्यांनी लेखी लिहून दिलं आहे की मला पदावर राहायचं नाही. आता तरी पंतप्रधान आणि राष्ट्रपती योग्य तो निर्णय घेतील, असे जयंत पाटील म्हणाले म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यपालांना यापूर्वीच हाकलून द्यायला हवे होते.
दरम्यान राज्यपाल भवनाकडून जारी पत्रात राज्यपालांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यभरात राज्यपालांच्या विरोधात आंदोलन झालं होतं. छत्रपतींच् वंशज उदयनराजे यांनीही संताप व्यक्त केला होता. यावर आज जयंत पाटील यांनी विचारलं असता आम्हाला काही दिवसांपासून राज्यपाल हे सांगत होते की मुझे जाना है, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या