मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NCP : शरद पवारांच्या वारसदाराविषयी 'सामना'नं केलेल्या टिप्पणीमुळं राष्ट्रवादी नाराज, तात्काळ दिलं उत्तर

NCP : शरद पवारांच्या वारसदाराविषयी 'सामना'नं केलेल्या टिप्पणीमुळं राष्ट्रवादी नाराज, तात्काळ दिलं उत्तर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 08, 2023 11:37 AM IST

NCP vs Shiv Sena UBT : शरद पवार यांच्या विषयी सामनाच्या अग्रलेखात करण्यात आलेल्या टिप्पणीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली असून संजय राऊत यांना महाराष्ट्रात सर्व्हे करण्याचा सल्ला दिला आहे.

Sharad Pawar and NCP
Sharad Pawar and NCP

NCP Reply to Saamana Editorial : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये केलेल्या एका टिप्पणीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी आहे. राष्ट्रवादीनं शिवसेनेचं हे विधान तात्काळ फेटाळलं असून ते कसं चुकीचं आहे हेही दाखवून दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अलीकडंच घडलेल्या राजकीय नाट्यावर सामनामध्ये अग्रलेख लिहिण्यात आला आहे. अग्रलेखात शरद पवारांच्या नेतृत्वाचं कौतुक करण्यात आलं आहे. शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला, असं अग्रलेखात म्हटलं आहे. मात्र, शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढं नेणारं नेतृत्व पक्षात उभं राहू शकलं नाही. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते असून त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे. असं असलं तरी पक्ष पुढं नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

सामनातील हीच टिप्पणी राष्ट्रवादीला खटकली आहे. पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'सामनातील टिप्पणीशी राष्ट्रवादी अजिबात सहमत नाही. पक्षाच्या स्थापनेपासून पवार साहेबांनी अनेक तरुणांना, समाजाच्या विविध घटकातील तरुणांना नेतृत्वाची संधी दिली आहे. राज्यातल्या प्रत्येक वाडी-वस्ती, तांड्यावर अनेक कुटुंब पवारांवर प्रेम करतात. ते सुद्धा पवार साहेबांच्या विचारांचे वारस आहेत. सुप्रिया सुळे, अजित पवार, छगन भुजबळ, वळसे-पाटील, सुनील तटकरे हे सगळे पवार साहेबांच्या राजकीय विचारांचे वारस आहेत. लाखो कार्यकर्ते त्यांचे वारस आहेत. त्यामुळं अग्रलेखातील टिप्पणी चुकीची आहे, असं महेश तपासे यांनी म्हटलं आहे.

सामनाच्या संपादकांनी महाराष्ट्राच्या जिल्ह्यांत, गावागावांत जाऊन सर्व्हे केला तर त्यांना कळेल की पवार साहेबांच्या विचारांचे वारस एक-दोन नव्हे, तर लाखोंच्या संख्येत आहेत, असंही महेश तपासे यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point