मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : शरद पवार गटाला मिळालेले नाव ‘या’ तारखेपर्यंतच वापरता येणार!

Sharad Pawar : शरद पवार गटाला मिळालेले नाव ‘या’ तारखेपर्यंतच वापरता येणार!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 07, 2024 09:07 PM IST

NCP Sharad Pawar Group : निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलेले नाव २७ फेब्रुवारी २०२४ पर्यंतच वापरता येणार असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar

निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रीवादीतील संघर्षाचा निवाडा करत शरद पवार गटाला मोठा धक्का देत राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले. यानंतर शरद पवार गट काय करणार? त्यांच्यासमोर कोणते पर्याय ? तसेच त्यांना कोणते चिन्ह आणि नाव मिळणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. 

याबाबत आज निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असून, यापुढे शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार असे नाव दिले. दरम्यान, हे नवीन नाव किती दिवस वापरता येणार, याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, निवडणूक आयोगाने दिलेले पत्रक मी वाचले असून यात शेवटच्या पॅरेग्राफमध्ये नमूद केले आहे की, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी वन टाईम नाव दिले आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीपुरतेच म्हणजे २७ फेब्रुवारीपर्यंतच हे नाव वापरता येणार आहे.राज्यसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाला दुसरे नाव मिळू शकते. 

लोकसभा, विधानसभा, विधान परिषदेत आम्हाला आता सगळी प्रक्रिया करावी लागणार आहे. कोणताही निर्णय लागल्यानंतर आपल्याला कोर्टात कॅवेट दाखल करावे लागते, म्हणून आम्हीही दाखल केले. आमच्या मागे कोणतीही महाशक्ती नाही ही सगळी लिगल ऑर्डर आहे, असंही पटेल म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या गटाला दिल्यानंतर आता शरद पवार गटाला नवं नाव देण्यात आलं आहे. 'नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' असं हे नाव आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, शरद पवार गटानं तीन पर्याय सुचवले होते. त्यातील  'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' हे नाव निवडणूक आयोगानं मान्य केलं आहे. त्यामुळं राज्यसभा निवडणुकीला ठोस नावानिशी सामोरं जाण्याचा मार्ग त्यांना मोकळा झाला आहे.

WhatsApp channel