शिवसेना कुणाची याचा फैसला सुनावल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ कुणाला मिळणार, याबाबर संपूर्ण राज्याला उत्सुकता लागली आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फूट पडली व एकनाथ शिंदे यांच्या पाऊलावर पाऊल टाकत अजित पवारांनीही राष्ट्रवादीवर दावा ठोकला आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गटाने परस्परविरोधी याचिका दाखल करत आमदार अपात्रतेची मागणी केली आहे. यावरील सुनावणी पूर्ण झाली असून आता १५ फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यावर निकाल देणार आहेत.
शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कोणाची याचा निकाल येत्या १५ दिवसात लागणार आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी दोन महिने चालली. सुनावणीचा निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने मुदत वाढवून दिली आहे.
शिवसेना कोणाची याचा निर्णय देताना नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असल्याचे जाहीर केले. यासाठी शिवसेनेची घटना, निवडणूक आयोगाने दिलेला निकाल तसेच शिवसेनेचा व्हिप महत्वाचा मुद्दा ठरला होता. मात्र राष्ट्रवादीबाबत निकाल देताना अन्य मुद्द्यावर विचार करावा लागणार आहे.
राष्ट्रवादीच्या सुनावणीदरम्यान शरद पवार गटाकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची उलट तपासणी झाली तर, अजित पवार गटाकडून सुनील तटकरे आणि अनिल पाटील यांची उलट तपासणी झाली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयानंतर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी पार पडली. मात्र राष्ट्रवादीच्या प्रकरणात निवडणूक आयोगाचा निकाल आलेला नाही. त्यातच आता विधिमंडळामध्ये राष्ट्रवादी खरी कुणाची याचा निकाल येत आहे.
संबंधित बातम्या