लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे वाहत आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून नेत्यांचे राज्यव्यापी दौरे सुरू झाले आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महायुतीला रोखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. आपल्याला सोडून गेलेल्या आमदारांना घेरण्यासाठी पवारांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली असून महायुतीतील अनेक नेते पवारांच्या गळाला लागत आहेत.
कोल्हापूर, सोलापूरनंतर शरद पवारांनी रविवारी भाजपचे आमदार जयकुमार रावल यांच्या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात मेळावा घेतला तर आज गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचा मातब्बर नेता पवारांच्या गळाला लागला आहे. विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तशा राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.त्यातच महायुती व महाआघाडीत अनेक नेत्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असल्याने बरेचसे नेते पक्षांतराच्या तयारीत असल्याची कुजबूज सुरू आहे.
दरम्यान, महायुतीतील घटक वप्रहारचे नेते बच्चू कडू यांनी मोठं विधान करत दावा केला की, अजित पवार गटातील निम्म्याहून अधिक आमदार शरद पवार गटात जातील तसेच अजित पवारही काही दिवसात शरद पवारांसोबत दिसतील.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमदार बच्चू कडू यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल हे विधान केलं आहे. विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधी अजित पवारांचे अर्ध्याहून अधिक आमदार शरद पवार गटात जातील. काही दिवसांनी अजित पवारही स्वगृही परतू शकतात. त्यांना कुणीही अडवलेले नाही. शेवटी हे राजकारण आहे. कधी कुणाच्या बाजुने जाऊन बसायचे कुणाबरोबर राहायचे, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे.
लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू आहे, त्याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले, हे तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत श्रेयवादाची लढाई तर होणारच. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष म्हणतोय की, लाडकी बहीण योजना आपणच आणली. मात्र यावरून लढत बसण्यापेक्षा यावर मार्ग काढला पाहिजे.