Sharad Pawar Retirement: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. रिंगणात उतरलेले उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. तर नेते मंडळी देखील प्रचारसभा घेत आहेत. बारामतीत विधानसभा निवडणुकीत उभे असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी सभा घेतली. या सभेत शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. तब्बल १४ वेळा निवडणूक आल्याचे सांगत आता राज्यसभा निवडणूक देखील लढवणार नसल्याचं शरद पवार यांनी या सभेत म्हटलं आहे. त्यांनी आता नव्या लोकांना निवडून द्यावे, असे म्हटले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षीही शरद पवार हे राजकारणात सक्रिय आहेत.
निवृत्तीचे संकेत देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आता मला कुठेतरी थांबावे लागेल. मला आता कोणतीही निवडणूक लढवायची नाही. त्यामुळे आता नव्या लोकांना पुढे यावे लागेल. मी आतापर्यंत १४ वेळा निवडणूक लढवली आहे. मला सांगायचे आहे की मी आता सरकारचा भाग नाही. अजून १.५ वर्ष आहे, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. आता मी निवडणुका लढवणार नाही. आघाडीचा पाठिंबा युगेंद्र यांना आहे. हे एक नवीन नेतृत्व आहे. मला जनतेची सेवा करायची आहे. सरकार आल्यास आम्ही सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.
पवार म्हणाले, तुमच्यातले काही लोक त्या वेळी हयात होते, काहींचा जन्म झाला नव्हता. मी ५५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या सगळ्या भागात काम करायला सुरुवात केली. १९६७ साली त्यावेळच्या मतदारांनी मला निवडून दिलं होतं. त्यातले काही मतदार मला अजूनही इथे दिसतात. मात्र, याला आता ५०-५५ वर्षं झाली आहे. मी सगळ्यांच्या पाठिंब्यानं विधानसभेत गेलो, राज्यमंत्री झालो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, संरक्षण खात्याचं काम केलं, शेती खात्याचं काम केलं आणि आज मी राज्यसभेत आहे. तुम्ही असले लोक आहात की एकदाही मला घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडूनच दिलं आहे. पण आता कुठेतरी थांबायला हवं. नवी पिढी आणली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलोय, असे म्हणत शरद पवार यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता आणि या वयात त्यांनी घरीच राहावे, ते कधी निवृत्त होतील हे माहीत नाही, असे म्हटले होते. यानंतर शरद पवारांनीही प्रत्युत्तर दिले. पवार म्हणाले, "अजित पवार माझ्या वयाबाबत वारंवार विधाने करतात. माझ्या राज्यसभेच्या कार्यकाळ संपायला अजून वेळ आहे. तोपर्यंत मी सेवा करेन. त्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही."