मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : " साहेब तुमचा फोटो आम्ही नाही लावणार, पण.." अमरसिंह पंडित यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Sharad Pawar : " साहेब तुमचा फोटो आम्ही नाही लावणार, पण.." अमरसिंह पंडित यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 27, 2023 09:07 PM IST

sharad pawar : अमरसिंह पंडित यांनी शरद पवारांनी दिलेल्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिली. साहेब आम्ही यापुढे तुमचा फोटो लावणार नाही, मात्र आमच्या देवघरातील तुमचा असलेला फोटो तुम्ही हटवून दाखवा, असे पंडित यांनी म्हटले आहे.

sharad pawar
sharad pawar

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांनी राज्याभर सभा घेत जनमत आपल्या बाजुने वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पवारांनी बीडमध्ये सभा घेतल्यानंतर याला उत्तर देण्यासाठी अजित पवारांकडून बीडमध्ये उत्तर सभा घेतली जात आहे. या सभेच्या व्यासपीठावरुन बोलताना गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. पंडित म्हणाले की, साहेब आम्ही यापुढे तुमचा फोटो लावणार नाही, मात्र आमच्या देवघरातील तुमचा असलेला फोटो तुम्ही हटवून दाखवा.

ट्रेंडिंग न्यूज

बीडमधील सभेतून शरद पवारांनी अजित पवार गटाला आपला फोटो बॅनरवरती वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अजित पवार गटाने बीडमधील सभेच्या बॅनरवर पवारांचा फोटो वापरलेला नाही. बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अण्णा भाऊ साठे पुतळा चौक, जालना रोड, बार्शी रोड व नगर रोडवर जागोजागी स्वागत  बॅनर, भव्य कटआउट्स तसेच स्वागत कमानी उभारल्या आहेत. सभेला लोकांसाठी अनेक ठिकाणांहून परिवहन महामंडळाच्या बसही लावल्या आहेत. मात्र, या सभेच्या ठिकाणी कुठेही शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला नाही. शरद पवार यांनी इशारा दिल्यानंतर प्रथमच अजित पवार गटाकडून शरद पवारांचे फोटो न लावता बीडमध्ये सभा होत आहे.

यावेळी अमरसिंह पंडित यांनी शरद पवारांनी दिलेल्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिली. साहेब, तुम्ही म्हणालात की माझा फोटो लावायचा नाही, अन्यथा कायदेशीर कारवाई करेल. पण या शिवछत्राच्या देवघरात तुमचा फोटो आहे. या पंडित कुटूंबाच्या देवघरात तुमचा फोटो आहे, मग जाऊन काढता का? तुमच्यात हिम्मत असेल तर काढून दाखवता का? असा सवाल अमरसिंह पंडित यांनी विचारला.

 

पंडित म्हणाले की, आम्ही तुमच्यावर मनातून प्रेम केलं, जन्मदात्या पित्याच्या पुढे नेऊन ठेवलं तुम्हाला. तुमचे आमच्यावर जे संस्कार आहेत, त्यानुसार तुम्ही म्हणत आहात तर यापुढे तुमचे फोटो लावणार नाही. पण, तुमचे संस्कार आमच्या मनातून काढता येतील का? असा सवालही अमरसिंह पंडित यांनी विचारला.

WhatsApp channel