आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने निर्णयांचा धडाका सुरूच ठेवत कोतवाल व होम गार्डच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र या बैठकीनंतर वेगळ्याच विषयाची चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते व मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली आहे. त्याचबरोबर वळसे पाटील पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारून वळसे पाटील ज पुण्यात शरद पवारांची भेट घेणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील हाती तुतारी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवारांनी आपल्याला सोडून गेलेल्या आमदारांना घेरण्यास सुरूवात केली असून त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे करत अनेकांची मतदारसंघातच कोंडी केली आहे. त्यातच वळसे पाटील यांनी तुतारी हाती घेत शरद पवारांकडे परत जाण्याचा निर्णय घेतल्यास अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असणार आहे.
गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट पडले होते. दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांचे नेतृत्व मान्य करत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला व मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र आता वळसे पाटील पुन्हा शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारल्यानंतर याची कुजबूज सुरू झाली आहे.
शरद पवार यांनी अजित पवार गटाला अनेक धक्के दिले आहेत. विदर्भात धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री यांना पक्षात घेऊन आत्राम यांना धक्का दिला. येथे बाप-लेकीची विधानसभेचा सामना होणार आहे. माढ्यात आमदार बबनराव शिंदे यांच्या पुतण्याला गळाला लावून तेथे मोठे आव्हान उभे केले आहे. कागलमध्ये भाजपचे नेते समरजीतसिंह घाटगे यांना पक्षात घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांची कोंडी केली आहे. इंदापुरात हर्षवर्धन पाटीलही शरद पवारांच्या संपर्कात आहेत. आता वळसे पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.