NCP jansanman melava : लोकसभा निवडणुकीतपराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला विधानपरिषद निवडणुकीत मोठा विजय मिळाल्याने आत्मविशावास आला आहे. अजित पवार गटाने आता विधानसभ निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून याची सुरुवात आपला बालेकिल्ला असलेल्या बारामतीतून केली आहे. आज बारामती येथे राज्यव्यापी जनसन्मान मेळावा आयोजित करून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. अजित पवार म्हणाले की,जनसन्मान मेळाव्यातून प्रत्येक जिल्हा,तालुका ढवळून काढायचा आहे.
या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री,राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार,विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज आयोजित केलेल्या जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे.या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी शरद पवार,सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार म्हणाले की, भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. विकासाचं ध्येय ठेवून पुढे जायचं आहे. विधानसभेला महायुतीला निवडून द्यायचे आहे. निवडणूक काळात हवसे, नवसे,गवसे येतील पण हा अजितदादा शब्द देणारा आहे.
मी राज्यासोबतच बारामतीचा विचार केला आहे.१८०कोटींचा निधी बारामतीला मिळणार आहे. लाडकी बहिण योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपये राज्याला मिळणार आहे. महिला सक्षम व्हावी,आत्मनिर्भर व्हावी,यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.त्याचबरोबर तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठीही हे सरकार चांगलं काम करत आहे. मात्र या योजना सुरू ठेवायच्या असतील तर पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आणावं लागेल," असं आवाहन अजित पवारांनी केलं.
भर पावसात अजित पवारांनी भाषण करत लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या अजेंड्याला बळी पडू नका, अशी साद बारामतीकरांना घातली. लोकसभा निवडणुकीत आम्ही संविधान बदलणार, असा खोटा प्रचार विरोधकांनी केला. मात्र जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत संविधान कोणीही बदलू शकणार नाही. आम्ही या संविधानानुसारच काम करत आहोत. आम्ही शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार मनात ठेवूनच काम करत आहोत, असे अजित पवार म्हणाले.
संबंधित बातम्या